रोहा तालुक्यात पूररेषेतील बांधकामे, परवानग्या वादाच्या भोवऱ्यात

उच्चस्तरिय तक्रारी दाखल, अधिकाऱ्यांवरच कारवाईचा बडगा?

कुंडलिका नदीकाठच्या गावांना पुराचा धोका


रोहा, दि. २० (विशेष प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यात कुंडलिका नदीच्या काठावर पुररेषेच्या हद्दीत विकासकांनी उच्छाद मांडला आहे. रोहा तालुक्याला बेकायदा इमारतींमुळे पुराचा धोका वाढत चालला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रोहा तालुक्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीकिनाऱ्यासह, पूररेषेतील बेकायदा व्यावसायिक बांधकामाच्या परवानग्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे.

जलसंपदा विभागाने कुंडलिका नदीच्या पात्रात तसेच पात्रालगत पूररेषा निश्चित केल्यानंतर या परिसरात कुठल्याही प्रकारचे व्यावसायिक बांधकाम उभारण्यास बंदी घालण्यात आली आहे. मा. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, पुणे यांच्या आदेशानुसार जलसंपदा विभागाने नदीच्या पात्रात तसेच पात्रालगत पूररेषा निश्चित केल्यानंतर महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगरपरिषदा यांनी पुररेषेपासून किमान काही अंतरापर्यंत कुठल्याही प्रकारचे बांधकाम उभारण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरीही रोहा कोलाड रस्त्यालगत कर्मा कन्स्ट्रक्शन या विकासकांकडून टॉवर इमारतींचे बांधकाम पुररेषेत (ब्ल्यू लाईन) सुरू असल्याने कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग कोलाड कारवाईच्या रडारवर आले आहेत. सदर बांधकामांबाबत पाटबंधारे विभागाकडून कुठलीही कार्यवाही होत नसल्याने रायगड पाटबंधारे विभाग कोलाड यांच्या यांच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त होऊ लागली आहे.
धनदांडगे व्यावसायिक पाटबंधारे विभागाला हाताशी धरून कुंडलिका नदीला विद्रूप करत असून यामुळे नदी परिसरातील गावांना पुराचा धोका वाढत चालला आहे. यामुळे रोहा तालुक्यातून मोठा असंतोष पसरला आहे, याबाबत उच्चस्तरिय तक्रारी दाखल होऊ लागल्याने पाटबंधारे विभागासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणल्याचे दिसत आहे.

Popular posts from this blog