जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या वाढणे गरजेचे -- किशोर जैन
पिगोंडे येथे शैक्षणिक साहित्य वाटपाच्या वेळी केले प्रतिपादन
नागोठणे : महेंद्र माने
रोहा तालुक्यातील पिगोंडे येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना पिगोंडे शिवसेना शाखा वतीने गुरुवार 03 ऑगस्ट रोजी सरपंच संतोष कोळी,शिवसेना महिला उपजिल्हा संघटीका दर्शना जवके,विभाग प्रमुख संजय भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना रायगड जिल्हा सहसंपर्क किशोर जैन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेल्या वही पेन,पेन्सिल व शैक्षणिक साहित्य वाटपाच्या वेळी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या वाढणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन किशोर जैन यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात किशोर जैन यांनी सांगितले की, माझ्या अध्यक्षतेखाली गेली 35 वर्षे पिंगोंडे शिवसेना शाखेच्या वतीने हा कार्यक्रम होत असून अशा कार्यक्रमाने विद्यार्थ्यांचाही उत्साह वाढत असतो. आपल्या सर्वांचे शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झालेले आहे.मी ही पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण जिल्हापरिषदेच्या शाळेत घेतलं आहे.तसेच बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले,सावित्री बाई फुले यासारखे अनेक महापुरुष यांनी सुध्दा असेच शिक्षण घेतलेले होते.त्यावेळी इंग्रजी माध्यम शाळा नव्हत्या तरीही मुले मराठी माध्यमात शिकून डॉक्टर,शिक्षक, इंजिनियर,वकील या सारखे उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर कार्यरत आहेत.परंतु आज जिल्हा परिषदेच्या शाळांमधील जी पटसंख्या घटत आहे. काही वर्षांपूर्वी आम्ही करत असलेल्या वह्या वाटपाच्या वेळी पटसंख्या ही शेकडो पेक्षा जास्त होती पण आता विद्यार्थ्यांची संख्या ही घटत चालली आहे.त्यावेळी या दोन्ही गावचे शिवराम पाटील व जनार्दन कोळी सारख्या अनेक प्रमुख मंडळींनी शाळा आणण्यासाठी व टिकण्यासाठी खुप प्रयत्न केले असल्याचे सांगून शाळा टिकविण्यासाठी येथील विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे शेवटी जैन यांनी सांगितले. यावेळी सरपंच संतोष कोळी यांनी गेली अनेक वर्षे हा वह्या वाटपाचा चांगला कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाप्रमाणेत आपल्या शाळेचा पट वाढविण्यासाठी सर्वांनी मिळून एक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सुचविले. या कार्यक्रमाला उपसरपंच कांचन माळी, ग्रा.पं.सदस्य कुसुम बावकर, माजी उपसरपंच राजेंद्र लवटे, उपविभाग प्रमुख बळीराम बडे,शिवसेना शाखा प्रमुख गंगाराम मिनमिने, उपशाखा प्रमुख लक्ष्मण घासे यांच्यासह ग्रामस्थ,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.