जयभवानी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

कर्मचारी सन्मान योजना ठराव मंजूर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव 

रोहा : प्रतिनिधी

रोह्यातील जय भवानी सहकारी पतसंस्थेची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी.बी.सरफळे रावसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी भवन येथे संपन्न झाली. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात संस्थेने जे कामकाज केले त्याचा संपूर्ण अहवाल उपस्थित सभासदांसमोर मांडण्यात आला. यावेळी १० वी, १२ वी तसेच पदवी परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.

यावेळी अध्यक्ष सरफळे रावसाहेब यांनी संचालक मंडळ, सदस्य व सभासद यांचा पतसंस्थेबद्दलचा विश्वास व सहकार्य यामुळे आज संस्थेचा नवलौकिक वाढलेला आहे, हे सर्वांना अभिमानास्पद आहे. संस्थेची अशीच प्रगती वाढावी यासाठी सर्वांनी संस्थेमध्ये बचत खाते उघडून आपल्या उत्पन्नातील काही भाग त्या खात्यामध्ये गुंतवावा. आयुष्यात स्थैर्य व यश मिळवण्यासाठी आर्थिक बचत करणे हे महत्त्वाचे आहे असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष शंकर भगत, सचिव सुहास खरीवले, संचालक मनोहर मेहतर, सुनील ठाकूर, जगदीश दामाणी, महेश बामुगडे, दिपक जाधव, किशोर सकपाळ, हेमंत राणे, संदीप सरफळे, सुलभा पवार, शर्वरी जाधव उपस्थित होते. 

सभेत प्रामुख्याने सभासदांच्या हिताच्या दृष्टीने केलेल्या आर्थिक उलाढालीची तपशीलवार माहिती देण्यात आली. संस्थेची आर्थिक उलाढाल व व्यवस्थापन या याबाबतीत लेखापरीक्षकांनी केलेल्या निरीक्षणाप्रमाणे संस्थेला ऑडिट वर्ग 'अ' मिळाल्याने सभासदांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना लाभ मिळावा यासाठी कर्मचारी सन्मान योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या सभेत पुढील वर्षाचे अंदाजपत्रकास व भागभांडवलाचे रकमेवर शेकडा आठ टक्के लाभांश देण्यास मंजुरी देण्यात आली. 

दिपक जाधव यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. उपाध्यक्ष शंकर भगत यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी अध्यक्ष सरफळे रावसाहेब आणि सहकारी संचालकांचे योगदानाबद्दल मार्गदर्शन केले. सुनील ठाकूर यांनी ठेवी, कर्ज वाटप खेळते भांडवल, नफा इत्यादी संबंधी तुलनात्मक आकडेवारीची माहिती दिली. सभासदांमधून अप्पा शेडगे, दगडू बामुगडे, महादेव बामुगडे, संताजी ठाकूर, मारुती गोळे, काशिनाथ कोदे, प्रशांत जाधव, नामदेव भगत, शरद जाधव यांनी चर्चेत सहभाग घेतला. 

सभा यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापिका बंदिनी धनावडे आणि लिपिक निता शिंगृत यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन सुहास खरीवले यांनी केले. सुत्रसंचलन महेश बामुगडे यांनी केले.

Popular posts from this blog