रोहा येथे बंद घरात चोरी, सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास!

रोहा : प्रतिनिधी

भुवनेश्वर निवी मार्गावर शिल्पनगरी जवळ असलेल्या घरात बुधवारी रात्री मोठी चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडली. घराच्या आजूबाजूला कोणीही नसल्याचा तसेच घरातील माणसे काही दिवस बाहेर गेली असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी चांगलाच डल्ला मारला. चोरीत दागिने, रोकड यांसह अन्य मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

चोरीची घटना समजताच रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक तपास सुरू करण्यात आला. अलिबाग येथील श्वान पथक, फिंगर पथक यंत्रणा शोधार्थ तातडीने दाखल झाली. गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकही दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

दरम्यान, "उपचारार्थ मुंबईला गेलो होतो, त्याचाच फायदा चोरट्यांनी उचलला. आम्ही घरात असतो तर कदाचित अनर्थ घडला असता, सुदैवाने आम्ही नव्हतो, अशी प्रतिक्रीया साठे यांनी दिली. रोहा शहरातील प्रतिष्ठीत नागरिक मोहन साठे यांनी काही वर्षांपूर्वी शिल्पनगरी समोरील जागेत छोटेखानी बंगला बांधला. त्या बंगल्याच्या आजुबाजूला फारशी वस्ती नाही, त्यामुळे साठे यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसवून कंपाउंड सुरक्षीत करून घेतले. 

मोहन साठे हे कामानिमित्त काही दिवस बाहेर गावी असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. चोरांनी प्रथम सीसीटीव्ही कॅमेरा तोडला. त्यानंतर दरवाजाचे लॉक तोडून तोडून दरवाजा शेजारील खिडकीचे ग्रील उपटून काढून खिडकीद्वारे घरात प्रवेश केला. 

आत घरात प्रवेश करून चोरट्यांनी कपाट, बेड सर्वच विस्कटून टाकले, रोखड दागिन्यांची शोधाशोध केल्यावर दागिने, 

रोकड लंपास केली. पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आठ ते दहा तोळे सोने, काही रोकड चोरीला गेल्याचे मोहन साठे यांनी पोलीसांना सांगितले. 

चोरट्यांना पकडण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा कार्यान्वित केली आहे, अशी  माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली.

Popular posts from this blog