सुकेळी खिंडीत पथदिवे व कायमस्वरूपी पोलीस चौकीची गरज 

कोलाड : निलेश महाडीक

मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील सुकेळी खिंड हे निर्जन ठिकाण असून या महामार्गांवरून असंख्य छोटी-मोठी वाहने येजा करीत असतात. याठिकाणी छोटे-मोठे अपघात होत असतात. यामुळे प्रवाश्यांच्या सुरक्षतेसाठी सुकेळी खिंडीतील निर्जन ठिकाणी पथदिवे व कायम स्वरूपी पोलिस चौकीची गरज आहे असे प्रवाशी वर्गातून बोलले जात आहे. 

मुंबई-गोवा हायवे वरील सुकेळी खिंडीत दोन्ही बाजूला चढ उतार असून आजूबाजूला घनदाट जंगल व झाडीझुडपे आहेत.यातून रात्रीच्या वेळी मार्ग काढतांना या महामार्गावरील रस्ता अंधारामुळे वाहन चालकांच्या चटकन निदर्शनास येत नाही. यामुळे येथे अनेकवेळा छोटे मोठे अपघात होत असतात. तसेच सुकेली खिंडीच्या आसपास वस्ती नाही यामुळे अपघातग्रस्त वाहनचालकांसह प्रवाश्यांना त्वरित मदत मिळण्यासाठी विलंब लागतो. परिणामी अपघातग्रस्त दवाखान्यापर्यंत पोहोचेल याची खात्री देता येत नाही.

मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेली खिंडीत चढ-उतारावरील प्रचंड खड्डे असल्यामुळे हे खड्डे चुकविताना एक महिन्यापूर्वी एक पोस्को कंपनीकडे जाणारा ट्रेलर दाट झाडीत कोसळला तो पूर्णपणे दरीत गेला. येथे पूर्णपणे अंधार असल्याने तो ट्रेलर  टसकाळशिवाय कोणालाही दिसला नाही सुदैवाने ट्रेलर दरीत जात असतांना ट्रेलर मधील वाहन चालकांनी उडी मारून आपले जिव वाचविले. परंतु त्या वाहनचालकाला या निर्जन ठिकाणी एकट्याला पुर्ण रात्र काढावी लागली.

सुकेळी खिंडीत रस्त्यावर  काही हिंस्त्र प्राणी ही दिसून येतात. येथे पूर्णपणे अंधार असल्यामुळे गाडी खाली येऊन मृत्यूमुखी पडतात. तसेच काही दिवसापूर्वी नागोठणे पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस जनार्दन मेंगाळ पेट्रोलिंगसाठी ड्युटीवर असतांना त्यांना सुकेली खिंडीत नर जातीचा रानगवा रस्त्याच्या बाजूला दिसला होता. त्यांनी प्रसंगवधान राखून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जागृत केले प्रत्येक वेळी येथे पोलिस असतील असे नाही. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी सुकेली खिंडीत पथदिवे व पोलीस चौकीची गरज निर्माण झाली असून याकडे संबंधितानी लक्ष देऊन पथदिवे व पोलीस चौकी सुरु करावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.

Popular posts from this blog