वरची वाडी विळे परिसरात पिसाळलेल्या माकडाला पकडण्यात अखेर स्थानिक तरुणांना यश 

तरुणांच्या धाडसाचे सरपंच, ग्रामस्थ व वन अधिकारी यांच्याकडून विशेष कौतुक

पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर

माणगांव तालुक्यातील वरचीवाडी विळे परिसरात एका पिसाळलेल्या माकडाने धुमाकूळ घातला होता. या माकडाने अनेक नागरिकांना चावा घेऊन जखमी केले होते. घरावरील पत्रे तोडणे, उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान करणें, घरात घुसून घरातील सामानाचे नुकसान करणे, दुकानात शिरून सामान उध्वस्त करणे या कारणाने नागरिक त्रस्त झाले होते. या माकडाला जेरबंद करण्यासाठी नागरिकांनी वन अधिकारी यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या. तक्रार आल्यानंतर वन अधिकारी यांनी माकडाला पकडण्यासाठी खूप वेळा प्रयत्न केला. पण काही केल्या माकड त्यांच्या हाती लागत नव्हते. 

अखेर स्थानिक तरुणांनी काहीही करून या माकडाला पकडायचेच असा निर्धार केला. तशी संधी काल दि.7 ऑक्टोबर 2022 रोजी तरुणांना मिळाली. भाजी वाली निलू भाभी यांच्या दुकानात माकड शिरले. माकड दुकानात शिरल्याचे लक्षात येताच भाभीने मोठ्या शिताफीने दुकानाचे शटर बंद करून स्थानिक तरुणांना याची कल्पना दिली. माकड दुकानात अडकल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मग मात्र आलेली संधी हातून जाऊन न देता मोठ्या धाडसाने तरुणांनी दुकानाला घेराव घालून व पिंजरा लावून माकडाला अखेर पिंजऱ्यात जेर बंद केले व वन अधिकारी यांना बोलावून माकडाला त्यांच्या स्वाधीन केले. इतके दिवस जे वन अधिकाऱ्यांना जमले नाही ते थानिक तरुणांनी केल्याने ग्रामस्थ, सरपंच व वन अधिकारी यांनी तरुणांच्या धाडसाचे तोंड भरून कौतुक केले. पिसाळलेल्या माकडापासून सुटका झाल्याने माकडाच्या दहशतीखाली वावरणाऱ्या नागरिकांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला.

Popular posts from this blog