बेकरीवाल्याचा निष्काळजीपणा; ग्राहकांच्या जीवाशी खेळ; बेकरी बंद करण्याचे निर्देश

नागोठणे शहरातील धक्कादायक प्रकार, पावात सापडली उंदरांची विष्ठा

नागोठणे : महेंद्र माने 

नागोठणे येथील किंग बेकरी मधील पावामध्ये उंदरांची विष्ठा (लेंडी) सापडली असून ग्राहकांच्या जीवाशी खेळणार्‍या बेकरीवाल्याचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सदरील बेकरीमध्ये अस्वच्छता व मानवी कायदा तरतूदींचे उल्लघन केले असल्याने पेण येथील अन्न व औषध प्रशासनाकडून बेकरी बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पाली - कुंभारशेत येथील तक्रारदार सचिन डोबले हे गुरुवारी एका हॉटेलमध्ये भाजी पाव व दोन एक्स्ट्रा पावच्या पार्सलची ऑर्डर केली. आलेल्या पार्सलमधील पाव भाजीच्या पाहिल्याच पावामध्ये डोबले यांना काही तरी काळे दिसले. ते निरखून पाहिल्यानंतर ते काळे उंदरांची (विष्ठा) लेंडी असल्याचे समजले. याबाबत हॉटेल मालकाला विचारणा केली असता सदरील पाव फेरीवाल्या मार्फत किंग बेकरीमधून आणल्याचे सांगीतले. त्यानुसार डोबले यांनी सदरील घटनेची रितसर तक्रार नागोठणे पोलीस ठाणे,नागोठणे ग्रामपंचायत व पेण येथील अन्न व औषध प्रशासनाकडे केली. तक्रार दाखल होताच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सचिन आढाव व विक्रम निकम हे आपल्या सहकार्‍यांसह बेकरीमध्ये तात्काळ दाखल झाले. त्यांनी पंचासह सदरील ठिकाणची पाहणी केली. बेकरीमध्ये सर्वत्र अस्वच्छता व कायदा 2006 मधील तरतूदींचे उल्लघन केल्यामुळे व्यवसाय बंद करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाकडून दिले आहेत. सतत होत असलेल्या बेकरीवाल्याचा निष्काळजीपणा ग्राहकांच्या जीवाशी खेळत असल्याबद्दल शहरात संतापाची लाट उसळत असून अशा बेफिकीर बेकरीवर कायदेशीर कठोर कारवाई करून बेकरी कायम स्वरूपी बंद करण्याची मागणी तक्रारदार सचिन डोबले व विभागातील नागरिकांकडून होत आहे.

सदरील बेकरीमध्ये सर्वत्र अस्वच्छता आढळून आली आहे. तसेच अन्न सुरक्षा व मानवी कायदा 2006 मधील तरतुदींचे उल्लघंन केले असल्यामुळे बेकरी व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

 - सचिन आढाव, अन्न सुरक्षा अधिकारी,

अन्न व औषध प्रशासन, पेण - रायगड


किंग बेकरीमधील पावामध्ये उंदराची विष्ठा सापडल्याची तक्रार ग्रामपंचायतकडे प्राप्त होताच किंग बेकरीचे शेखजाद खुर्शिद अन्सारी व नूर सबा यांना बेकरी चालवण्या करिता घेतलेले सर्व परवाना कागदपत्रे ग्रामपंचायत कार्यालयात सादर करण्याबाबत नोटीस दिली आहे.

 - मोहन दिवकर

ग्रामविकास अधिकारी, ग्रा.पं.नागोठणे

Popular posts from this blog