माणगांव तालुक्यात भामट्याने अनेकांची फसवणूक केल्याची चर्चा 

लोन देतो असे सांगून अनेकांना लुबाडले?

 फसवणूक झालेल्यांनी न घाबरता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे गरजेचे 

माणगांव : प्रतिनिधी

लोन (कर्ज) देतो असे सांगून भामट्यांच्या टोळीने माणगांव तालुक्यात अनेकांची फसवणूक केल्याची चर्चा सुरू आहे. १५ दिवसांत लोन (कर्ज) मिळवून देतो असे सांगून येथे अनेकांची लाखो रूपयांची फसवणूक झालेली असून फसवणूक करणारे हे गुंडगिरीची भाषा वापरणे, आवाज चढवून बोलणे, महिलांना भांडायला पुढे करणे, दमदाटी करणे, महिलांमार्फत आरोप करण्याची धमकी देणे असे घाणेरडे कृत्य करीत असल्यामुळे फसवणूक झालेले सर्वसामान्य नागरिक तक्रार दाखल करण्यासाठी घाबरून पुढे येत नसल्याचे दिसत आहे. परंतु अशा वेळी नागरिकांनी न घाबरता फसवणूक करणाऱ्या भामट्यांविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे गरजेचे आहे.

भरमसाठ रक्कमेचे कर्ज जलद गतीने देण्याचे आमीष दाखवून एका भामट्याच्या टोळीने अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार घडल्याने याबाबत विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे आणि लोन देतो अशी बतावणी करणाऱ्या कुणालाही आधी पैसे देऊ नये! अनेक बेरोजगारांना, तसेच गरजवंतांना व्यवसायासाठी मोठ्या रक्कमेच्या कर्जाची आवश्यकता असते. त्यांपैकी अनेकजण नामांकीत बँकांकडे कर्जाची मागणी करतात. तर काहीजण झटपट कर्ज मिळविण्यासाठी धडपडत असतात आणि शॉर्टकट मार्गाने जाऊन स्वतःची फसवणूक करून घेत असतात. अशाच प्रकारे मोठ्या रक्कमेचे कर्ज मिळविण्यास इच्छुक असणाऱ्यांची फसवणूक करण्यासाठी काही "लुटारू" टपून बसलेले असतात. कर्जाची गरज असलेल्या एखाद्या गरजू माणसाला शोधण्यात हे "लुटारू" चांगलेच पटाईत असतात. 

कर्ज देण्यासाठी प्रोसेसिंग फी च्या नावाखाली ३० ते ५० हजारांची रक्कम घेतली जाते. पण अनेक महिने होऊन देखील कर्जाचा थांगपत्ता नसतो! अर्थात, येथे फसवणूक झालेली असते. कर्ज तर मिळतच नाही म्हणून दिलेले पैसे तरी परत करा अशी विनवणी करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना उलट दमदाटी करणे, आवाज चढवून बोलणे, महिलांनाना भांडायला पुढे करणे, महिलांमार्फत "आरोप" करण्याची धमकी देणे असे घाणेरडे प्रकार येथे घडत असल्याने येथील नागरिकांनी प्रथम सावध रहावे व ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांनी सर्वप्रथम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे गरजेचे आहे.

Popular posts from this blog