ग्रुप ग्रामपंचायत कुडगांवचे ग्रामसेवक यांच्याकडून अर्जदारास माहिती देण्यास टाळाटाळ
विस्तार अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांनी घेतले सोंग?
रोहा : किरण मोरे
रोहा (रायगड ) कुडगांव येथील नारायण लखमा भूनेसर यांनी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय-कुडगांव येथे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय-कुडगांव चे लेखा परिक्षण अहवाल/हिशेब तपासणी अहवाल (ऑडिट रिपोर्ट) सविस्तर तपशील व संबंधित तपशिल, माहिती व दस्तावेज मिळणेबाबत माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज दाखल केला होता. सदर माहिती अधिकार अर्जास अनुसरून माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कलम ७(१) मधील तरतूदीनुसार अर्ज प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या विहित मुदतीत अर्जदारास माहिती देणे बंधनकारक असताना माहिती न दिल्याने अर्जदाराने दिनांक - ०५ मे २०२२ रोजी विस्तार अधिकारी (ग्रा.पं), पंचायत समिती कार्यालय,लश्रीवर्धन यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले. सदर अपीलावर दिनांक - २८ जून २०२२ रोजी सुनावणी आयोजित करून दिनांक - २९ जून २०२२ रोजी श्री.किशोर विष्णू नागे, विस्तार अधिकारी (ग्रा.पं), पंचायत समिती कार्यालय, श्रीवर्धन यांनी अर्जदारास १५ दिवसांच्या आत विनामूल्य माहिती देण्याचे आदेश पारीत केले. परंतु आदेश प्राप्त होऊन तब्बल १५ दिवसांनंतर ही श्री.डी.एस.नेमाणे, जन माहिती अधिकारी तथा ग्रामसेवक, गृप ग्रामपंचायत कुडगांव यांनी अद्याप पर्यंत माहिती दिलेली नाही. जन माहिती अधिकारी यांचेकडून प्रथम अपील आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली की नाही याची विस्तार अधिकारी यांनी पडताळणी केली नाही. पंचायत समिती कार्यालय श्रीवर्धन आणि अंतर्गत कार्यालयांतील संबंधित जन माहिती अधिकारी आणि प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडून माहितीचा अधिकार अधिनियम २००५ ची वारंवार पायमल्ली करण्यात येत असून माहिती अधिकार अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून अनेक महिन्यांनतरही माहिती दिली जात नसल्यामुळें संबधित शासकिय कर्मचारी/अधिकारी यांच्याकडून काही चुकीचे प्रकार तर घडले नाहीत ना? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. याबाबत विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, श्रीवर्धन यांसह संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी झोपेचे सोंग घेतले असल्याबाबत तालुक्यातील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून संबंधित शासकिय कर्मचारी/अधिकारी यांच्या कामकाज पद्धतीवर शंका व्यक्त करण्यात येत आहे. कनिष्ठ कर्मचारी यांचेकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात येत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे सिद्ध होत आहे. पंचायत समिती श्रीवर्धन येथील वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून आपल्या कनिष्ठांना कर्मचाऱ्यांची पाठराखण करण्याची वृत्ती सिद्ध होत आहे.
नागरिकांस वारंवार कायदे शिकविणारे संबंधित शासकीय कर्मचारी/अधिकारी यांच्याकडूनच वारंवार कायद्याचे उल्लंघन होत असल्याने "सर्व एकाच माळेचे मणी" अशी परिस्थिती निर्माण झाली असून "मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार" असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.