रोहा तालुक्यातील पालेखुर्द शाळेत ४ वर्गांसाठी एकच शिक्षक, नवीन शिक्षकाच्या नियुक्तीकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष! 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला धोका 

तातडीने नवीन शिक्षकाची नियुक्ती करावी : युवा नेते महेशदादा ठाकूर यांची मागणी

रोहा : समीर बामुगडे

रोहा तालुक्यातील पालेखुर्द रा.जि.प. प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग असून त्यामध्ये एकूण २९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु एकूण ४ वर्ग आणि इतकी विद्यार्थी संख्या असताना देखील या शाळेवर एकच शिक्षीका कार्यरत आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचे काम एकच शिक्षीका करीत असल्यामुळे येथे विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिक्षण मिळेल का? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. याउलट रोहा तालुक्यात अनेक ठिकाणी अशाही शाळा आहेत की जिथे विद्यार्थी संख्या कमी असताना देखील शिक्षकांची संख्या जास्त आहे. परंतु पालेखुर्द प्राथमिक शाळेकडे शासनाचे दुर्लक्षच झाल्याचे दिसून येत असून याप्रकरणी युवा नेते महेशदादा ठाकूर यांनी गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, रोहा पंचायत समिती यांच्याकडे तक्रार दाखल केली असून तातडीने येथे नवीन शिक्षक नियुक्त करण्याची मागणी केली आहे.

प्राथमिक शाळा रा.जि.प. पालेखुर्द येथे शाळेचा एकूण पट २९ असून, माहे ३१ जुलै २०२१ रोजी श्री. बाळकृष्ण सखाराम म्हात्रे हे शिक्षक सेवा निवृत्त झाल्यापासून सौ. सुनिता जगन्नाथ मढवी या शिक्षीका एकट्याच कार्यरत असून शाळेची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांना सर्वच शाळेची कामे करणे अवघड जात आहे. त्यामुळे दुसरा शिक्षक उपलब्ध झाल्यास मुलांच्या गुणवत्तेत चांगली वाढ होईल.

शिवाय मराठी शाळेकडे मुलांचा ओढा वाढावा यासाठी सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सतत प्रयत्न गावात करीत आहेत. तरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी दुसरा शिक्षक तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी युवा नेते महेशदादा ठाकूर यांनी दाखल केलेल्या तक्रारीद्वारे केली आहे.

Popular posts from this blog