महाराष्ट्र शिक्षक पॅनल कडून अंकुश जाधव यांची सेवासन्मान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड
रोहा : समीर बामुगडे
रोहा तालुक्यातील निवी गावचे सुपुत्र श्री. अंकुश नथुराम जाधव हे शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री सतीश मोहन पाटील यांच्या "न्यू इंग्लिश स्कूल कळंबोली" विद्यालयात गेली १६ वर्षे कार्यरत आहेत. विविध संस्थांकडून त्यांना ९ वेळा "आदर्श शिक्षक पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले आहे.
अंकुश जाधव हे एक दिव्यांग शिक्षक असून ते अत्यंत बुद्धिमान, प्रामाणिक, कष्टाळू व्यक्तिमत्त्वाचे आहेत. त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, संस्कृती कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन "श्री साई प्रतिष्ठान पुणे", राष्ट्रीय काव्यांगण लेखणीचे साहित्य मंच तथा सामाजिक संघटना आणि राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था आणि श्री राजपूत करणी सेना जळगाव आदी सामाजिक संस्थांनी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारांनी गौरविले आहे.
आज त्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय, गुणवत्तापूर्ण सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल व शाळेतील विविध उपक्रमांची दखल घेऊन महाराष्ट्र शिक्षक पॅनल निवड समितीच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला असून या पुरस्कार निवडीचे पत्र नुकतेच महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने रायगड जिल्हा विभाग निवड समितीचे सदस्य श्री सुरेश भगवान शिंदे यांनी अंकुश जाधव यांस दिले.
अंकुश जाधव यांना आजपर्यंत आदर्श शिक्षक, वृक्षमित्र, काव्यभूषण, ज्ञानभूषण, समाजरत्न, शिक्षकरत्न, कविभूषण, समाजभूषण, उत्कृष्ट निवेदक असे अनेक पुरस्कार आहेत आणि महाराष्ट्र शिक्षक पॅनलने सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी केलेली निवड त्यांच्या गुणगौरवात मानाचा शिरपेच चढवते. आज त्यांच्यावर सर्व स्तरांतून, तसेच सहकारी अध्यापक वृंद, विद्यार्थी, पालक, मित्र परिवार, निवी ग्रामस्थ, नातेवाईक यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.