रोहामध्ये ऑनलाईन चक्री मटका तेजीत, पोलीसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी

धाटाव/रोहा : किरण मोरे 

रोहामध्ये सध्या अनेक ठिकाणी ऑनलाईन चक्री मटका जुगार राजरोसपणे सुरू असून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी हा चक्री मटका तातडीने बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे.  

सध्या रोहे शहरातील धावीर मार्केट, रायकर पार्क, खैरकर हॉस्पिटलच्या बाजूला आणि नवरत्न हॉटेलच्या परिसरात असे एकूण ४ ठिकाणी ऑनलाईन जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असून या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. 

अनेक तरूण व वयोवृद्ध माणसे त्यांचा महिन्याचा पगार या ऑनलाईन जुगारामध्येच खर्च करीत असून अनेकांच्या कुटूंबात वाद-भांडणे सुरू असल्याचे दिसत आहे. या ऑनलाईन जुगारामध्ये एक वेळा योगायोगाने जिंकलेली व्यक्ती पुन्हा-पुन्हा जिंकण्याच्या आशेने आपली मेहनतीची कमाई वारंवार यामध्येच घालवित असल्याचे दिसत आहे. या जुगाराच्या नादाने अनेक जुगारवेड्या तरूणांनी घरातील महिलांचे दागिने विकल्याचे धक्कादायक प्रकार देखील घडलेले आहेत. सदरचे ऑनलाईन चक्री मटका जुगारचे धंदे या परिसरात आजपर्यंत कायम सुरू असून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तातडीने हा चक्री मटका बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.

Popular posts from this blog