रोह्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर! 

सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे तहसीलदारांना निवेदन

रोहा (रविना मालुसरे) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोह्यात वाढत असतानाच, त्याला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सपशेल अपयशी पडल्याची स्थिती रोह्यात दृष्टीपथात पडत आहे. रोह्यातील सामाजिक प्रश्नांची जाण असणाऱ्या सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने या प्रश्नाकडे रोहा तहसीलदारांचे लक्ष वेधले आहे आणि परिस्थिती सुधारण्यासाठी तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. 

रोह्यातील उपजिल्हा रुग्णालयातील उपलब्ध डॉक्टर्स, आरोग्य सेवक हे अत्यंत प्रामाणिकपणे रुग्ण सेवा देत आहेत. मात्र प्रशासनाकडून त्यांना आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. कोरोना साठी लागणारे व्हेंटिलेटर्स येथे उपलब्ध आहेत मात्र ते हाताळण्यासाठी कुशल कारागीर नसल्यामुळे ते धूळखात पडले आहेत. कोरोना व्यतिरिक्त इतर कारणांमुळे मृत पावलेल्या रुग्णांचे शवविच्छेदन करण्याबाबत ही अशीच स्थिती आहे. त्यामुळे नातेवाईकांना मृतदेह घेऊन अलिबाग, माणगांवला जावे लागते. जीवंत रुग्णांसारखीच मृतदेहांच्या वाट्यालाही पायपीट आल्याचे चित्र दिसत आहे.

एकंदरीत कोरोनाच्या आत्ताच या परिस्थितीला सामोरे जाताना अत्यावश्यक असणारे रेमडेसिवीर इंजेक्शन्स, व्हेंटिलेटर्स व कुशल तंत्रज्ञ यांची पुरेशी उपलब्धता असल्यास वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रुग्णांना सुयोग्य उपचार देऊ शकतील. या सर्वांची उपलब्धता करण्यासाठी शासन स्तरावरून लवकरात लवकर प्रयत्न व्हावेत असे तहसीलदारांसोबत झालेल्या चर्चेत सुचविण्यात आले.

रोह्यात कोरोना लसीकरणाचीही वाट अत्यंत बिकट आहे. गेले कित्येक दिवस लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण ठप्प आहे. तरी मुबलक लसींची उपलब्धता होण्यासाठी प्रयत्न केले जावेत. लसीकरण मोहिमेत सामाजिक संस्थांचे सहकार्य घ्यावे, आम्ही त्यासाठी स्वतःहून पुढे येत आहोत असेही सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानने स्पष्ट केले. यावेळी सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रोशन चाफेकर, स्वराज रणदिवे, प्रसाद पाटुकले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, भारतीय जनता युवा मोर्चा रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.अमित घाग यांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांना पत्र लिहून ह्या विषयाचे गांभीर्य स्पष्ट केले. व्हेंटिलेटर्स कार्यान्वित करण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची लवकरात लवकर पुर्तता करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Popular posts from this blog