डॉ. प्रकाश वागळे यांच्या निधनाने पिंगळसई-देवकान्हे विभागात शोककळा

अफाट जनसंपर्क असलेल्या निस्वार्थी व्यक्तीमत्वाची एक्झिट मनाला चटका लावणारी!

रोहा (रविना मालुसरे) : 
डॉ. प्रकाश वागळे यांचे उडदवणे, ता. रोहा येथील कुंडलिका नदी तीरावरील पालदाड पुलालगतच्या राहत्या निवासस्थानी दिनांक ३ एप्रिल २०२१ रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने पिंगळसई-देवकान्हे परिसरात दुःखाची छाया पसरली आहे.
डॉ. प्रकाश विनायक वागळे यांचा जन्म ९ डिसेंबर १९४३ रोजी झाला. जन्मताच ते बुद्धिमान व मृदू स्वभावाचे होते. सुरुवातीला त्यांनी पडम जवळच्या पेपर मिल मध्ये कामाला सुरुवात केली. नोकरी सांभाळून ते अर्धवेळ वैद्यकीय व्यवसाय पाहत होते. मात्र नंतर पेपरमिलचा कारखाना बंद झाल्यावर त्यांनी पूर्णवेळ वैद्यकीय सेवेला वाहून घेतले. पिंगळसई ते देवकान्हे हा भाग तेंव्हा रहदारीपासून वंचित होता. प्रवासासाठी वाहने नव्हती आणि पक्के रस्तेही नव्हते. पावसाळ्यात तर पालदाड पुलावरून पाणी जात असल्यामुळे ह्या भागाचा रोह्यापासूनचा संपर्क तुटायचा. यावेळेस आजाराच्या साथी पसरायच्या. अशा वेळी लोकांना एकच आधार म्हणजे डॉक्टर प्रकाश वागळे! ते रात्री-अपरात्री या परिसरातील रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना उपचार द्यायचे. कधी कमी दरात, तर कधी मोफत अशी त्यांची कित्तेक वर्ष अविरत समाजसेवा सुरू होती. मागील काही वर्षांपासून त्यांना प्रकृती साथ देत नव्हती. पण त्यावर मात करून त्यांनी पुन्हा नव्या जोमाने रुग्णसेवा करण्यास सुरुवात केली. मात्र अचानक त्यांना देवाज्ञा झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये शोक व्यक्त होत आहे. रुग्णांना औषधोपचारा प्रमाणे त्यांच्याबरोबर मातृ हृदयाने बोलणारे डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती. ह्या परिसरातील त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. याखेरीज त्यांनी मायेने जोडलेला खुप मोठा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी दिनांक १२ एप्रिल रोजी व कार्य विधी दिनांक १५ एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरी होणार आहेत.

Popular posts from this blog