माणगांव शहरात डौलाने फडकला तिरंगा, ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
माणगांव (उत्तम तांबे) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान असे महान ग्रंथ भारत देशाला बहाल केले त्यामुळेच २६ जानेवारी १९५० पासून आपला देश प्रजासत्ताक झाला. म्हणजेच भारतातील प्रत्येक नागरिकाला एकमत देण्याचा अधिकार दिला. ह्या मताच्या आधारेच प्रजेची सत्ता निर्माण झाली. म्हणून प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. २६ जानेवारी २०२१ रोजी हा उत्सव देशभरात साजरा होत असताना माणगांव शहरात ७२ वा प्रजासत्ताक दिन विविध ठीकाणी मोठ्या उत्साहात साजरा होत डौलाने तिरंगा फडकला.
अशोकदादा साबळे विद्यालय माणगांव या विद्यालयाच्या पटांगणामध्ये मोठ्या उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. राजीव साबळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे ध्येयपूर्वक वाचन करण्यात आले. या उत्सवादरम्यान या संस्थेचे प्रमाणिक कर्मचारी रविंद्र ना. मोरे यांना रायगड जिल्हा परिषद तर्फे आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्राप्त झाल्याने तसेच गजानन साळुंके सर यांना पीएच. डी. पदवी प्राप्त झाल्याने त्यांचा संस्थाध्यक्ष अॅड .राजीव साबळे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक गौरव करण्याा आला. तसेच या विद्यालयातील विद्यार्थी कु. शुभम दिलीप जाधव याने चित्रकला स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच इयत्ता ८ वीतील विद्यार्थिनी कु.अमृता भानुदास बिरादार, कु. श्रावणी भारत तांबोळकर, कु. सृष्टी विकास डोंबाळे तर इयत्ता ५ वीतील कु. शुभांगी दयानंद बोडके या विद्यार्थिनीने स्कॉलरशिप परिक्षेत उच्च श्रेणी प्राप्त केल्यामुळे या सर्व गुणी विद्यार्थांचा या प्रजासत्ताक दिनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त माणगांव नगरपंचायत प्रांगणामध्ये नगरपंचायत कार्यालयाचे मुख्याधिकारी श्री. राहुल इंगळे यांच्या शुभहस्ते तर माणगांव पंचायत समितीच्या कार्यालया समोर मा. पं. स. सभापती सौ. अलका जाधव यांच्या हस्ते, तसेच माणगांव पोलीस ठाणे परेड ग्राऊंडवर उपविभागीय आधिकारी तथा प्रांताधिकारी सौ. प्रशाली दिघावकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या उत्सवप्रसंगी माणगांव तालुक्यातील नेतेगण, नगरसेवक, नगरसेविका, समाजसेवक, शिक्षक, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते.