तळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस  अध्यक्ष पदी नारायण उर्फ नाना भौड यांची नियुक्ती

तळा (संजय रिकामे) : खा.सुनिल तटकरे यांचे अत्यंत विश्वासु निष्ठावंत कार्यकर्ते नाना भौड यांची राष्ट्रवादी काँग्रेस तळा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुतारवाडी येथील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. सुनिल तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत युवा नेते आ. अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड, महिला व बालकल्याण सभापती गीताताई जाधव, पंचायत समिती सभापती अक्षरा कदम, उपसभापती गणेश वाघमारे, रा. जि. प. सदस्य बबन चाचले, पंचायत समिती सदस्य सौ. देवकी लासे, महिला तालुका अध्यक्षा सौ. जान्हवी शिंदे, स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत रोडे, चंद्रकांत राऊत, युवक अध्यक्ष नागेश लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. खा. सुनील तटकरे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यक्षम आणि विश्वासू असणाऱ्या नाना भौड  यांच्यावर पदभार सोपवला आहे. 

नाना भौड हे पढवण हायस्कूलचे विद्यमान अध्यक्ष असून तळा पंचायत समिती सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. कुणबी समाजाचा एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. भौड यांनी  यांनी नव्याने पदभार स्विकारताना सांगितले की, यापुढेही अधिकाअधिक लोकाभिमुख व जनकल्याणकारी विकासकामे करून पक्ष संघटना मजबुतीवर भर देणार असल्याचे सांगितले. खा. सुनिल तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, युवा नेते आ. अनिकेत तटकरे यांच्या सहकार्याने तळा तालुक्यात कार्यकर्त्यांची एक मोठी फळी उभी करुन सर्वकष विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचा मनोदय नाना भौड यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस तळा तालुका अध्यक्षपदी नाना भौड यांची नियुक्ती झाल्या बद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेेमुळे ग्रामीण भागात खोलवर रुतली असून दोन जिल्हा परिषद गट, पंचायत समिती तसेच अनेक ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. परंतु तळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित असे यश अजून मिळालेले नाही. काही दिवसांनी तळा नगरपंचायत निवडणूक जाहिर होईल. या निवडणुकीमध्ये सर्वोत्तम कामगिरी बरोबरच शहरात पक्ष संघटना मजबूत करण्याचे आवाहन नवीन अध्यक्षांसमोर राहील.

Popular posts from this blog