बोर्लीपंचतन येथे वोडाफोन कंपनीच्या सदोष इंटरनेट सेवेविरोधात जन आंदोलन
बोर्ली पंचतन (मुझफ्फर अलवारे) : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन विभागामध्ये गेले काही महीने इंटरनेट सेवेसह मोबाइल रेंजची अवस्था खुपच दयनीय झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या विभागात व्होडाफोन, आयडीया, बी.एस.एन.एल. या मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कच्या सुविधा चालू आहेत. परंतु त्यांच्या इंटरनेट सेवेबाबत बोंबाबोंब आहे. त्यातच गेल्या वर्षभरापासून सातत्याने मोबाईल इंटरनेट सेवा ठप्प होऊ लागली आहे. या विभागात व्होडाफोनची ग्राहक संख्या जास्त असूनही गेले वर्षभर या कंपन्यांकडून ग्राहकांना हवी तशी सेवा मिळत नाही. त्याबाबत वेळोवेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे लक्ष वेधून व तक्रार करुनही ते त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शुक्रवार दि. ४ डिसेंबर रोजी बोर्लीपंचतन येथे व्होडाफोन कंपनीविरोधात मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांना संबोधित करताना शामकांत भोकरे, सुकुमार तोंडलेकर, महंमदभाई मेमन यांनी सांगीतले की, यापुढे जर व्होडाफोन कंपनीने आपली सेवा सुधारली नाही तर २१ डिसेंबर रोजी कंपनीचा निषेध नोंदविण्यासाठी बोर्लीपंचतन बंद चे आवाहन करुन आमच्या विभागात असलेला व्होडाफोनचा टॉवर बंद करण्यात येईल. या आंदोलनात शामकांत भोकरे, सुकुमार तोंडलेकर, महंमदभाई मेमन, नंदु पाटील, निवास गाणेकर डॉ. सुजाता बापट बोर्लीपंचतन सरपंच नम्रता गाणेकर, उपसरपंच उत्तम दिवेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक सहभागी झाले होते. त्याचबरोर सदर मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी श्रीवर्धन उपविभागीय पोलीस आधिकारी श्री. बापुराव पवार, म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मोरे व दिघी सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आपल्या विविध तक्रारींचे निवेदन तहसिलदारांच्या वतीने मंडळ अधिकारी सुनिल मोरे यांनी स्विकारले.