दापोलीमध्ये महिलेला मारहाण करून विनयभंग! 

नराधम विशाल मालवणकर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल 

रत्नागिरी (प्रतिनिधी) : एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नराधम विशाल मालवणकर याच्याविरूद्ध दापोली पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३५४ (अ),(ब), ५०९, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी की, संबंधित महिला ही एका खाजगी वाहनाने मंडणगडमधून टेटवली येथे जात असताना वाकवली नाका येथे त्यांच्यासमोरून बेकायदेशिररित्या खैर लाकडाने भरलेला एक ट्रक त्यांच्यासमोरून पुढे निघून गेला व तो ट्रक टेटवली येथील विशाल मालवणकर यांच्या सुप्रिया कत्ता फॅक्टरीमध्ये शिरला. याबाबत सदर महिलेने तातडीने वनविभागाचे अधिकारी श्री. बोराटे यांच्याशी संपर्क साधून त्यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी हे घटनास्थळावर दाखल झाले. त्यानंतर सदर महिला तेथून एका रिक्षामध्ये बसून जाण्यास निघाली. पण त्याच वेळी विशाल मालवणकर हा त्याच्या क्रेटा गाडीतून रिक्षाचा पाठलाग करीत आला व रिक्षाचालकाला दमदाटी करून रिक्षा थांबविली. त्यानंतर त्याने सदर महिलेला ओढून बाहेर काढले व तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून, अश्लील वर्तन करून तिला मारहाण केली व जीवे मारण्याची धमकीही दिली. 

याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात नराधम विशाल मालवणकर याच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल सक्षी गुजर ह्या पुढील तपास करीत आहेत. 

Popular posts from this blog