कोंबड्यांचा बळी पडलेल्या खड्ड्यात दडलेय काय? 

देवदेवस्कीचा प्रकार की, पैशाचा पाऊस? सर्वत्र भीतीचे सावट! पोलीसांनी केला क्षणात उलगडा, जनतेने घेतला सुटकेचा श्‍वास

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांची कर्तव्यदक्षता

रायगड (भिवा पवार) : विज्ञानाने सर्वच क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. प्रत्येक गोष्टीत विज्ञान मोठ्या प्रमाणात संशोधन करत आहे. जग चंद्रावर गेले आहे, मात्र अजूनही ग्रामीण भागातील जनता अंधश्रद्धेच्या मायाजाळात अडकून, देवदेवस्की, बुवाबाजी, अंधश्रद्धा, यांवर विश्वास ठेवत आहे म्हणजे "जग गेले चंद्रावर व बुवाबाजीवर विश्वास ठेवणारे राहिले उंदरावर!" असे म्हटले तर वावगे ठरू नये, याची प्रचिती कोलाड परिसरातील चिंचवली फाट्याजवळील महादेववाडी  जवळील कालव्याजवळ नदीच्या काठावर घडली. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई-गोवा महामार्गावर असणारे कोलाड नेहमी गजबजलेले असते. याच कोलाडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चिंचवली कालव्याजवळ महादेववाडी रस्त्याच्या बाजूला नदीच्या बाजूला चार कोंबड्या डोके उडवले अवस्थेत दिसल्या. तसेच ज्याठिकाणी नारळ, लिंबू, काळा भोपळा कापून टाकलेल्या अवस्थेत दिसले तसेच बाजूला खोल खड्डा खोदून त्यामध्ये काहीतरी पुरून टाकले असल्याचे आढळले याविषयी परिसरामध्ये सर्वत्र दबक्या आवाजात कुजबूज सुरू होती, त्या खड्ड्यात काय आहे? यावर भीतीचे सावट निर्माण झाले होते त्याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. नरबळी तर नाही ना? असे तर्कवितर्क केले जात होते. मात्र सदर घटना समजताच सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे, चिंचवली चे माजी सरपंच भास्कर पवार कार्यकर्ते यशवंत पवार, पांडूरंग सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली व तात्काळ यासंदर्भात पोलीसांना माहिती दिली. त्यानंतर माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले कार्यतत्पर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव हे त्यांचे सहकारी हेडकॉन्स्टेबल सय्यद, प्रसाद पाटील, नितीन पाटील यांच्यासह घटनास्थळावर पोहोचले व परिसरात कायदा, सुव्यवस्था आणि शांतता राखण्याच्या दृष्टीने या धक्कादायक प्रकाराची काळजीपूर्वक पाहणी केली. 

घटनास्थळी देवदेवस्की करताना बळी घेतलेले कोंबडे तसेच बळी देऊन काही गोणीमध्ये सुद्धा कोंबडे टाकण्यात आले होते ते बाहेर काढण्यात आले. तसेच खड्डा खोदण्यात आला होता संशयास्पद वाटत होता तो आपल्या सहकाऱ्यांच्या साह्याने दूर करण्यात आला. त्यामध्ये काळ्या कपड्यांमध्ये दहा ते बारा बळी दिलेले कोंबडे भोपळा, लिंबू , कुवाला असे अनेक साहित्य त्या खड्ड्यातून बाहेर काढून खातरजमा केली. त्यामध्ये कोंबड्यांचा बळी दिल्याचे सर्वांना समजले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. 

याबाबत जनतेने भीतीने घाबरून जाऊ नये  बुवाबाजी, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये आजारी पडल्यावर त्वरित डॉक्टर कडे जावे. बुवाबाजी, अंधश्रध्दा यांच्या आहारी जाऊ नये व आपला वेळ, आपली आर्थिक नुकसान आणि करून घेऊ नये असे प्रकार निदर्शनास आल्यास कोलाड पोलीस ठाण्यात त्वरित संपर्क करावा असे आवाहन कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुभाष जाधव यांनी केले असून त्यांच्या तात्काळ धडकेबाज कामगिरीमुळे त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे परीसरात कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog