ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

देगांव येथील अंगणवाडीच्या शासकीय निधीसाठी बेकायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून शासनाची फसवणूक! 

रायगड (किशोर केणी) : 

माणगांव तालुक्यातील देगांव येथील अंगणवाडीच्या शासकीय निधीकरिता बेकायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जनसेवा संघटना माणगांव चे अध्यक्ष अॅड. अनिकेत ठाकूर यांनी उघडकीस आणलेला असून त्यांनी गोरेगांव पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करून संबंधितांवर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी गटविकास अधिकारी (गट-अ) यांनी या तक्रारीच्या अनुषंगाने शासनाकडून वेळोवेळी निर्गमीत झालेल्या शासन निर्णय व परिपत्रकाप्रमाणे तक्रारीच्या अर्जाचा अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

माणगांव तालुक्यातील देगांव येथील अंगणवाडीची नवीन इमारत बांधण्याकरिता रायगड यांच्याकडील जिल्हा वार्षिक सन २०१९-२० अंतर्गत कामाची निविदा योग्य त्या नोंदणीकृत कंत्राटदाराकडून पर्सेन्टेज रेट टेंडर दोन लिफाफा पध्दतीने मागविण्यात येत आहेत असे वर्तमानपत्रात निविदा प्रसिध्द करण्यात आली. त्यानुसार mahatendar.in या संकेतस्थळावरून दिनांक २१ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता ते दिनांक ३१ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता या वेळेत ई-निविदा प्रसिध्द कालावधी देण्यात आला होता. त्याअनुषंगाने ई-निविदा उघडण्याची तारीख व वेळ दिनांक ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजता होती. त्यामध्ये तीन कंत्राटदारांनी निविदेसाठी अर्ज केले. त्यातील अभिषेक जैन, संतोष सुतार आणि आकाश चंद्रकांत साळुंखे याप्रमाणे नावे होती. त्यातील अभिषेक जैन यांची निविदा मान्य करण्यात आली. परंतु कंत्राटदारांनी अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केलेली दिसते. 

कंत्राटदाराने केलेले सत्यप्रतिज्ञालेख हे कायद्याने वैध नाही. तरीसुध्दा त्या सत्यप्रतिज्ञालेखाच्या आधारे त्यांच्या निवीदा स्विकारण्यात आलेल्या आहेत. देगांव, ता. माणगांव, जि. रायगड येथे बांधण्यात येणाऱ्या अंगणवाडीची इमारत ज्या जागी बांधण्यात येणार आहे त्या जमीन मालकाचे बक्षीसपत्र घेण्यात आलेले नाही. अंगणवाडीची इमारत मौजे देगांव, ता. माणगांव, जि. रायगड येथील जमीन मिळकत तथा कथित सर्व्हे नं. १२४/४ या जमीन मिळकतीवर बांधण्यात येत आहे. त्या जमीन मिळकतीचा ७/१२ हा अधिकृत तलाठी सजा देगांव यांच्या सही-शिक्क्यानीशी घेण्यात आलेला नाही. तसेच ज्यांनी अंगणवाडीच्या इमारतीसाठी संमतीपत्र दिलेले आहे त्या शेवंती सखाराम कदम यांचे संमतीपत्र सुध्दा कायदयाने वैध नाही आणि त्यांचे ७/१२ पत्रकी कुठेही नाव नाही. 

एकंदरीत पाहता अंगणवाडीची इमारत बांधण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची कुठेही पुर्तता करण्यात आलेली नाही. तरी सुध्दा देगांव येथील तथाकथित जागेवर अंगणवाडीच्या इमारतीच्या जोत्याचे काम पूर्ण झालेले आहे. ग्रामपंचायतीची जोता बांधण्याकरीता कोणतीही परवानगी या कागदपत्रांमध्ये दिसून येत नाही. ग्रामसेविका, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच कंत्राटदार या सर्वांनी आर्थिक संगनमत करून आणि बेकायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून अंगणवाडीच्या इमारतीचे बेकायदेशीर जोत्याचे काम केलेले आहे. बेकायदेशीर कागदपत्रांची पुर्तता करून शासनाचा निधी हडप करण्याचे कृत्य ग्रामसेविका, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच कंत्राटदार या सर्वांनी आर्थिक संगनमत करून केलेला आहे. ग्रामसेविका, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच कंत्राटदार या सर्वांनी शासनाची फसवणूक केलेली आहे. तरी यासंदर्भात योग्य ती चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी तक्रार जनसेवा संघटना माणगांव चे अध्यक्ष अॅड. अनिकेत ठाकूर यांनी गोरेगांव पोलीस ठाणे येथे दाखल करून संबंधितांवर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. तसेच  याप्रकरणी गटविकास अधिकारी (गट-अ) यांनी या तक्रारीच्या अनुषंगाने शासनाकडून वेळोवेळी निर्गमीत झालेल्या शासन निर्णय व परिपत्रकाप्रमाणे तक्रारीच्या अर्जाचा अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Comments

Popular posts from this blog