माणगांव तालुक्यात जमीन खरेदी-विक्रीमध्ये दलालांचे मोठे रॅकेट कार्यरत, दिवाळीपूर्वीच होणार पर्दाफाश!
शासकीय अधिकारी बनलेत राजकारण्यांच्या हातातील बाहुले!
माणगांव (प्रतिनिधी) :
जमीन खरेदी-विक्रीमध्ये तसेच शासनामार्फत संपादित केलेल्या जमिनीचे पैसे मिळवून देण्यासाठी भरमसाठ पैसे उकळणाऱ्या दलालांचे रॅकेट रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात कार्यरत असून या दलालांमार्फतच शासनाचे अधिकारी चुकीच्या मार्गाने पैसे कमवू लागले आहेत. येथे अनेक ठिकाणी जमीनीचे बेकायदेशीर व्यवहार देखील झालेले असून सध्या अनेक राजकीय पुढारी भूमाफीया बनल्याचे दिसत आहेत. माणगांव तालुक्यातील जनसेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. अनिकेत ठाकूर हे दिवाळीपूर्वीच या प्रकरणाचा पर्दाफाश करणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना लुबाडून भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांची दलाली करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसण्याच्या मार्गावर आहे.
माणगांव तालुक्यात सध्या जमीनीचे बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्यांनी धुमाकूळ घातलेला असून हे बेकायदा जमीन व्यवहार करणारे दलाल म्हणजे भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अवैध उत्पन्नाचे साधन बनून राहिले आहेत. या दलालांसोबत 'अर्थपूर्ण' व्यवहार करून येथील शासकीय अधिकारी हे राजकीय दबावाखाली काम करू लागले आहेत. या दलालांपासून व भूमाफीयांपासून अनेक वेळा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होण्याचे प्रकार घडत असतात. मात्र अशा वेळी प्रशासनाकडे अथवा महसूल विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर त्या तक्रारीला 'केराची टोपली' दाखविण्यात येत असते. कारण शासकीय अधिकारी हे राजकीय दबावाखाली काम करीत असल्याने येथे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणे कठीण झालेले आहे. जनसेवा संघटनेने या समस्येची दखल घेतल्याने दिवाळीपूर्वीच याप्रकरणाचा पर्दाफाश होणार आहे.