लॉकडाऊनच्या काळात आधार महिला बचत गटाला ग्रीन व्हॅली कंपनीने दिला आधार

हळद लागवडीसाठी कंपनीने दिली एक एकर शेत जमीन व बियाणे खरेदीसाठी आर्थिक मदत 


पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) :

माणगांव तालुक्यातील सणसवाडी गावच्या माजी सरपंच देविका पाबेकर या आधार महिला बचत गटाच्या अध्यक्षा आहेत. २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर भागाड एम.आय.डी.सी. मधील बहुतेक कंपन्या बंद झाल्या. सर्वात मोठ्या कंपनी पोस्को कंपनीचेही कामगार घरी बसले. कंपनीचे अत्यावश्यक विभाग फक्त सुरू होते. या कामगारांना गेटच्या बाहेर येण्यास मुभा नव्हती. त्यामुळे कंपनीच्या बाहेर जे हॉटेल व्यावसायिक होते त्यांचे हॉटेल बंद झाले. यामध्ये देविका पाबेकर यांच्या अध्यक्षतेखाली चालणारे आधार महिला बचत गटाचेही हॉटेल होते. त्यामुळे इतरांप्रमाणे त्यांचेही हॉटेल बंद झाले. या हॉटेलच्या माध्यमातून बचत गटाच्या महिला परिसरातील कंपन्यांच्या कामगारांना जेवणाचे डब्बे पुरवीत असत. परंतु कंपन्या बंद झाल्याने कामगार बंद झाले व महिलांच्या हातचे काम गेले व त्यांना घरी बसावे लागले. नेहमी कामाची सवय असणाऱ्या महिलांना घरी रिकामे बसणे अवघड जात होते. ही बाब देविका पाबेकर यांना खटकत होती. आपण महिलांसाठी काहीतरी करायला हवे असे त्यांना सारखे वाटत होते. ज्या सणसवाडी भागात त्यांच्या बचत गटाचे हॉटेल आहे त्याच भागात ग्रीन व्हॅली इको स्ट्रक्चर कंपनी लिमिटेड हि कंपनी आहे. देविका पाबेकर सरपंच असताना ग्रीन व्हॅली कंपनीचे काम सुरू होते. त्यावेळी ग्रीन व्हॅलीचे अधिकारी यांना सणसवाडी ग्रामपंचायतमध्ये यावे लागत असे. तेव्हा हे अधिकारी देविका पाबेकर यांना चांगले परिचित होते. सरपंच असल्याने ग्रीन व्हॅली कंपनीची एक एकर शेत जमीन पडीक असल्याचे पाबेकर यांच्या लक्षात आले. लॉकडाऊनच्या काळात महिला घरी बसून आहेत. कंपनीच्या या पडीक जमिनीवर महिलांनी जर मेहनत करून एखादे पीक घेतले तर महिलांना घरात रिकामे बसावे लागणार नाही असा विचार करून त्यांनी महिलांची मिटिंग घेतली व आपण घरी बसून राहण्यापेक्षा शेती केली तर..? असा प्रस्ताव महिलांसमोर मांडला. त्यास महिलाही तयार झाल्या. शेतात हळद लावायची असेही ठरले. आता प्रश्न होता ग्रीन व्हॅलीच्या पडीक शेतजमिनीच्या संचालकांची परवानगी घेण्याचा. ती जबाबदारी देविका पाबेकर यांनी घेतली. त्यांनी ताबडतोब ग्रीन व्हॅलीचे अधिकारी यांची भेट घेऊन महिलांचा शेती करण्याचा प्रस्ताव त्यांच्या समोर मांडला. 



कंपनीच्या अधिकाऱ्यांना महिलांचा प्रस्ताव खूप आवडला व त्यांनी ही बाब कंपनीचे संचालक यांना कळवली व त्यांनीही मोठ्या मनाने महिलांना शेती करण्यास परवानगी दिली. एवढेच नाही तर शेती साठी लागणारे बियाणे आणण्यासाठी कंपनीच्या फंडातून आर्थिक मदत केली. तांबडी, ता. रोहा येथे जाऊन महिलांनी बियाणे आणले. ग्रीन व्हॅली कंपनीच्या एक एकर शेत जमिनीवर हळदीची लागवड केली. यासाठी महिलांनी अपार मेहनत करून शेती फुलवली. हळदीचे पीक फेब्रुवारीमध्ये तयार होईल. आधार बचत गटाच्या महिलांची मेहनत पाहून ग्रीन व्हॅली चे संचालक हे बेहद खूष झाले व त्यांनी महिलांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. 

लॉगडाऊनच्या काळात आधार बचत गटाच्या महिलांनी केलेली यशस्वी हळदीची लागवड हा या परिसरात चर्चेचा विषय बनला असून इतर महिलांसाठी त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. सर्व स्थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Popular posts from this blog