पाटणूसच्या आरोग्य उपकेंद्राच्या मागे साडेसाती? गेल्या दहा वर्षांत इमारतीला दोनदा निसर्गाचा फटका बसल्याने शासनाचे लाखो रूपये पाण्यात
पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) :
माणगांव तालुक्यातील पाटणूस येथील आरोग्य उपकेंद्राला गेल्या दहा वर्षांत दोनदा निसर्गाचा फटका बसल्याने व इमारतीची पडझड झाल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. हकीकत अशी की, पाटणूसच्या भूमीवर आरोग्य उपकेंद्राची निर्मिती झाल्यानंतर साधारण 15 वर्षांनंतर या इमारतीत प्रसूतीगृहाची व्यवस्था असावी असा प्रस्ताव शासनाकडून आला होता. त्यामुळे जुनी इमारत व प्रसूतीगृह अशा दोन्ही एकत्र करून इमारतीची पुनर्बांधणी 2010, 11 या साली करण्यात आली. इमारत सुसज्ज झाल्यानंतर या उपकेंद्रात डॉक्टर येण्याची प्रतिक्षा ग्रामस्थ करीत होते. परंतु ही इमारत पूर्ण होऊनही डॉक्टरांची नियुक्ती झाली नाही. त्यामुळे प्रसूतीगृह पुर्ण होऊनही डॉक्टरांअाभावी प्रसूतीगृह चालू झाले नाही. केवळ आरोग्यसेविकाच हे आरोग्य केंद्र चालवत होत्या.
आरोग्यकेंद्र अत्याधुनिक करून दोन वर्ष झाली नाहीत तोच मार्च 2013 मध्ये आरोग्यकेंद्राच्या शेजारी असलेल्या वडाच्या झाडाची भली मोठी फांदी आरोग्यकेंदारावर पडल्याने इमारतीची पडझड झाली. त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली मात्र ती व्यवस्थित न केल्याने दर पावसाळ्यात इमारतीत पाणी गळत राहिल्याने व आरोग्य सेविका नियमित तेथे न राहिल्याने इमारत पुन्हा नादुरूस्त झाली. बरोबर सात वर्षा नंतर या आरोग्य उपकेंद्रात डॉक्टरांची नियुक्ती होणार असल्याने पुन्हा एकदा एप्रिल 2020 मध्ये आरोग्य उपकेंद्राची दुरुस्ती करण्यात आली. इमारतीचे सर्व पत्रे बदलण्यात आले. रंगरंगोटी करण्यात आली व पुन्हा एकदा सुसज्ज असे आरोग्य उपकेंद्र उभे राहिले. आता प्रतिक्षा होती ती फक्त डॉक्टर रूजू होण्याची. परंतु पुन्हा एकदा पाटणूस ग्रामस्थांच्या आड दुर्दैव आले आणि 3 जून 2020 रोजी झालेल्या चक्रीवादळात पाटणूसचे आरोग्य उपकेंद्र पूर्ण उध्वस्त झाले.
हे आरोग्य केंद्र सध्या धो-धो कोसळत असणाऱ्या पावसात भिजत असून ते नुसते दुरुस्त करून त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण पावसात भिजून या इमारतीच्या भिंती पूर्ण निकामी झाल्या आहेत. त्यामुळे इमारतीची पुनर्बांधणी केली तरच त्याचा फायदा होईल अन्यथा ही इमारत दुरुस्त केली तर ते धोकादायक ठरेल असे येथील जाणकारांचे म्हणणे आहे.