रायगड जिल्हा पोलीस दलातील बिनतारी विभागाची उत्कृष्ट कामगिरी
रायगड (किशोर केणी) :
रायगड जिल्ह्यातील हवामान खात्याने निसर्ग चक्रीवादळ होणार असल्याचे संकेत दिले होते. निसर्ग चक्रीवादळ दरम्यान मोबाईल फोन व लँडलाईन यंत्रणा कोलमडण्याची शक्यता असल्याने पोलीस अधीक्षक श्री. अनिल पारस्कर यांनी पोलीस बिनतारी यंत्रणा कुठल्याही परिस्थितीत बंद पडणार नाही, अशा प्रकारे सुसज्ज ठेवण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस बिनतारी विभागाचे माथेरान व विल्सन पॉइंट रिपीटरकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता होती. त्याकरिता विनंती प्रमाणे पो. अधीक्षक बि. सं. पश्चिम विभाग पुणे यांनी तातडीने दिनांक २ जून २०२० रोजी रात्रीच दोन्ही ठिकाणी तांत्रिक अधिकारी/ कर्मचारी पथक रवाना केले. पोलीस निरीक्षक बिनतारी संदेश रायगड आर. बी. पाटील यांनी मुरुड, पेण, श्रीवर्धन, रोहा, माणगाव येथे द/व अखंडित ठेवणे कामी बिनतारी कर्मचाऱ्यांची पथके तयार ठेवली होती. मांडवा सागरी व मुरुड येथे वॉटा वर द/व होणे कामी तातडीने लिंक रिपिटर उभारणी करून घेतली होती. चक्रीवादळ दरम्यान, श्रीवर्धन व मुरुड येथे बिनतारी विभागाचे कर्मचारी देखील झाडे पडल्यामुळे रस्त्यातच अडकून पडले होते. दळण वळणाची इतर सर्व यंत्रणा कोलमडून पडल्याने पोलीस बिनतारी यंत्रणेवरच पोलीस अधीक्षक रायगड जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना सूचना देत होते व नियंत्रण कक्ष येथे जीवितहानी व मालमत्ता नुकसानी बाबत सतत माहिती घेतली जात होती. सदर संपर्क यंत्रणेमुळे चक्रीवादळ संपल्यावर तातडीने मुख्य रस्त्यावरील झाडे बाजूला करणे व वाहतूक सुरु करणे शक्य झाले. सदर काळात विजपुरवठाही खंडित झाला असल्याने सर्व बिनतारी स्थानके व रिपीटर येथे जनरेटरची व्यवस्था करून विजेऱ्या डिस्चार्ज होऊन स्थानक बंद पडणार नाही याबाबत चोख व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे बिनतारी दळण-वळन यंत्रणा अखंडित कार्यरत राहिली. विशेष म्हणजे मान्सून पूर्व सर्व स्थानकांवर योग्य देखभाल दुरुस्ती केली असल्याने चक्रीवादळा मुळे बिनतारी यंत्रणेची काहीच नुकसान झाले नाही. जिल्ह्यातील व्हीसट यंत्रणा देखील सतत सुरु राहिली. तसेच ३ दिवस कार्यालयाचा विजपुरवठा खंडीत झाल्याने उपलब्ध जनरेटर, इनव्हरटर इत्यादींचे योग्य नियोजन करून अत्यंत कार्यक्षमतेने वापर करण्यात आला. जिल्हा पोलीसचे बिनतारी द/व सांभाळत असतानाच जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष करिता देखील जिल्ह्यातील हँम रेडीयो पथके यांच्याशी समन्वय ठेऊन मुरुड, पेण, रोहा, तळा म्हसळा व श्रीवर्धन तहसील कार्यालयाकरिता तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष, जिल्हधिकारी निवासस्थान व वाहनात बिनतारी विभागाचे बिनतारी संच बसवून देण्यात आले. हम नेटवर्ककरिता रिपिटर उभारणी कामी विल्सन पॉईंट, महाबळेश्वर येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय नेटवर्क क्षिप्रतेचा एक संच पोलीस नियंत्रण कक्ष येथे बसवुन तसेच पोलीस क्षिप्रतेचा एक संच जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षात बसवून माहिती देवाण-घेवाण योग्य समन्वय ठेवण्यात आला.
तरी सदर यंत्रणा अखंडित कार्यरत ठेवणेकामी पोलीस निरीक्षक बिनतारी संदेश आर. बी. पाटील व त्यांचे सहकारी अधिकारी/कर्मचारी यांनी दिनांक २ जून पासून ६ जून २०२० पर्यंत अथक परिश्रम घेतले आहेत.
