मालस‌ई येथील कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण बरा होऊन घरी परतला 

मालस‌ई गाव झाले कोरनामुक्त


रोहा (रविना मालुसरे) :
मालस‌ई तालुका रोहा येथे कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सापडल्या नंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. सदरच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर एम.जी.एम .रुग्णालय कळंबोली येथे यशस्वी उपचार झाले असून ते कोरोनापासून पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. या मुदतीत रुग्णांच्या संपर्कातील कुटुंबीय व ग्रामस्थांना निरीक्षणामध्ये ठेवण्यात आले होते. तथापि सदरच्या नागरिकांना कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांबरोबरच प्रशासनानेही सुटकेचा निश्वास सोडला आहे. सदरचे कुटुंब हे मुंबईहून गावात वास्तव्यास आले होते. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. या मुदतीत त्यांनी होम क्वारंटाईनच्या नियमांचे काटेकोर पालन केले होते. ग्रामस्थांनीही लाॅकडा‌ऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले. ग्रुप-ग्रामपंचायत मालस‌ईच्यावतीने निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्यात आली. या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजे मालस‌ई गावाने कोरोना मुक्तीच्या दिशेने केलेली वाटचाल होय. त्यामुळेच आज ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सापडल्यामुळे प्रशासनाने गाव सील केले होते. गेले अनेक दिवस लाॅकडाऊन व कंटेनमेंट झोन यामुळे गावातील लोक गावातच अडकले होते. त्यातच निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण गावाला झोडपून काढले. गावातील सुमारे 110 घरांपैकी जवळपास 100 हून अधिक घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरच उपजीविकेचे साधन नसल्यामुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांचे चक्रीवादळाने जगणे असह्य केले आहे. शासनाने कोरोना संसर्गित क्षेत्र व चक्रीवादळाने त्रस्त झालेल्या गावकऱ्यांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. तसेच चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने लवकरात लवकर द्यावी अशीही मागणी करण्यात येत आहे.

Popular posts from this blog