पत्रकारांना विमा संरक्षण लागू करा 
माणगांव प्रेस क्लबचे तहसिलदारांना निवेदन 



माणगांव (उत्तम तांबे) :
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कोरोना पार्श्वभूमीवर आपल्या समाजहितार्थ निर्भीड लेखणीच्या माध्यमातून आपले कर्तव्य बजावीत आहे. हे कर्तव्य निभावताना लॉकडाऊनमध्ये कित्येक पत्रकारांना कोरोना विषाणूला समोरे जावे लागले आहे. मुंबई मधील ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे जीवन आज संकटमय झाले आहे ही वस्तुस्थिती आहे. या संकटात संरक्षण म्हणून पत्रकारांना विमा संरक्षण ही काळाची गरज आहे. पोलीसांना पन्नास लाख रुपयाचा विमा संरक्षण तर महानगरपालीकेच्या कर्मचाऱ्यांना दहा लाख रुपयांचा विमा संरक्षण तर मग पत्रकारांनी काय गुन्हा केला आहे ? पत्रकार सुद्धा डॉक्टर्स, नर्स, पेथॉलॉजिकल, पोलिस यांच्या बरोबरीने काम करीत आहे. म्हणून पत्रकारांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे या न्याय व हक्कासाठी माणगांव तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना माणगांव तालुका प्रेस क्लबतर्फे निवेदन देण्यात आले आहे. पत्रकार आज वैश्विक कोरोना संकटात, संचारबंदीत जीवाची बाजी लावून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता काम करतोय. कोरोना संकटात सापडलेल्या अनेकांची वास्तव स्थिती, शासन सूचनांचे पालन करण्यासाठी समाजप्रबोधनपर माहिती आपल्या लेखणीद्वारे जनते पर्यंत पोहचविणे, गोरगरीब, दीन-दुबळ्यांची आर्थिक परिस्थिती जगासमोर आणली. भूकेलेल्यांना अन्न, मदत मिळवून देण्यासाठी याच पत्रकारांनी आवाज उठविला आहे. अनेकांना त्यांनी केलेल्या सत्कर्मांचे आपल्या लेखणीद्वारे कौतुक करुन प्रोत्साहीत केले. परंतु स्वतःसाठी मात्र कसलीच अपेक्षा केली नाही. याच गोष्टीच्या जाणीवेतून माणगांव प्रेस क्लबच्या सर्व पत्रकार सदस्यांनी मिळून एकमुखाने निर्णय घेतला असून राज्याचे मुख्यमंत्री यांना माणगांव तहसिलदार श्रीमती प्रियंका आयरे यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे.

राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आणि प्रशासकिय अधिकारी यांनी पत्रकारांची हीच स्वाभिमानी प्रवृत्ती लक्षात घ्यावी. तसेच पत्रकारांनाही तातडीने मदत देण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी. यासाठीच पत्रकारांना कमीतकमी विमा संरक्षण तरी मिळावे या मागणीचा विचार व्हावा. म्हणून दि. ६ मे रोजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती वजा मागणीचे निवेदन माणगांव तालुका प्रेस क्लबच्या वतीने तहसिलदारांकडे सादर केले आहे. कोव्हिड-१९ संदर्भात तातडीच्या सभेसाठी तहसिलदार बाहेर गेल्या असल्या कारणे नायब तहसिलदार बी. वाय. भाबड यांनी ते स्विकारले आहे.

याप्रसंगी माणगांव तालुका प्रेस क्लबचे पत्रकार अध्यक्ष उत्तम तांबे, माजी अध्यक्ष गौतम जाधव, ज्येष्ठ सल्लागार रविंद्र कुवेसकर या तिघांनी प्रातिनीधीक म्हणून एकत्र न येता गर्दी टाळत  प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांच्या वतीने निवेदन दिले आहे.  याप्रसंगी जेष्ठ सल्लागार अरुण पवार, अनिल मोकाशी, सचिव गिरीश गोरेगांवकर, कार्याध्यक्ष पद्माकर उभारे, खजिनदार संतोष सुतार, ए एम न्युज चॅनलचे सुनिल राजभर हे सर्व पत्रकार कोरोना आचारसंहितेचे पालन करीत सुरक्षित अंतर ठेऊन तोंडाला मास्क बांधून तहसिल कार्यालयात निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

Popular posts from this blog