पारनेरमधील तो गोळीबार ठरला खोटा ! झाले होते असे काही...
अहमदनगर / पारनेर : गावठी कट्टा हाताळताना अचानक खटका दाबला गेल्याने तरुणाच्या डाव्या हाताच्या दंडात गोळी घुसली. परंतु कट्टा बेकायदेशीर असल्याने जखमी तरुणाने अज्ञात लोकांनी गोळीबार केल्याचा बनाव केला.
पारनेर पोलिसांनी या घटनेचा तपास करून जखमी तरुण व त्याच्या दाजीवर गुन्हा दाखल करून कट्टा व जिवंत काडतुसे जप्त केली. संजय बाळू पवार (२३ वर्षे, राळेगण थेरपाळ) व दादाभाऊ किसन चव्हाण (टाकळी हाजी) अशी आरोपींची नावे आहेत.
ही घटना ५ मार्चला सकाळी दहा वाजता घडली. गुरुवारी सकाळी संजय हा टाकळी हाजी-गुणोरे रस्त्यावर दाजीला भेटण्यासाठी आला होता. भेट झाल्यावर तो आपल्या गावी राळेगण थेरपाळ येथे निघाला.
टाकळी हाजी-गुणोरे रस्त्यावर ओढ्याजवळ तीन-चार तरुण भांडण करत होते. भांडण करणाऱ्यांपैकी कोणीतरी गोळीबार केला. ती गोळी आपल्या उजव्या हाताच्या दंडाला लागल्याचा बनाव करून संजय शिरूर येथील खासगी रुग्णालयात दाखल झाला. याचा साक्षीदार त्याचा दाजी दादाभाऊ चव्हाण होता.
डॉक्टरांनी संजयच्या उजव्या दंडातून गोळी काढली, परंतु पोलिसांना जबाब देताना तफावत जाणवल्याने पारनेरचे सहायक निरीक्षक राजेश गवळी, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, सहायक निरीक्षक गायकवाड, हेडकॉन्स्टेबल अशोक निकम, चौगुले, भालचंद्र दिवटे, डमाळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.