गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तरुणांनी ग्रामसभांमध्ये सक्रिय सहभाग घेणे काळाची गरज!
स्थानिक बेरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांचे आवाहन
बदलाची सुरुवात आपल्या वस्तीतूनच
खालापूर-रायगड, दि. १ (प्रतिनिधी) :- आपल्या भागाचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा खरा विकास घडवून आणायचा असेल, तर केवळ वरिष्ठ पातळीवर अवलंबून न राहता गावपातळीवरील व्यवस्थेत सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे. गावाच्या विकासाची खरी नांदी ही ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतून होत असते; मात्र दुर्दैवाने आज ग्रामसभांकडे दुर्लक्ष होत असून त्या केवळ कागदावरच उरल्या आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि गावाला विकासाच्या योग्य मार्गावर नेण्यासाठी गावातील तरुणांनी एकत्र येऊन ग्रामसभांच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, असे परखड मत स्थानिक बेरोजगार संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा माथाडी संघटक श्री. राजेंद्र हिराजी पाटील यांनी व्यक्त केले आहे.
सध्याच्या ग्रामीण व्यवस्थेवर आणि ग्रामसभांच्या सद्यस्थितीवर बोलताना राजेंद्र पाटील यांनी तीव्र खंत व्यक्त केली. तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये नियोजित ग्रामसभा या केवळ नावालाच होतात. तब्बल ९९ टक्के ग्रामसभा या सुरुवातीला तहकूब केल्या जातात आणि त्यानंतर सरपंच, मोजके सदस्य व ग्रामसेवक अशा तीन ते चार लोकांच्या उपस्थितीतच महत्त्वाच्या विषयांची औपचारिकता पूर्ण केली जाते. गावात एखादा वाद किंवा तंटा उद्भवला तरच संपूर्ण गाव एकत्र येतो आणि १०० हून अधिक लोकांची उपस्थिती दिसू लागते; मात्र गावाच्या विकासाचे, योजनांचे आणि निधीचे महत्त्वाचे निर्णय ज्या ग्रामसभेत होतात, तिथे मात्र ग्रामस्थांची आणि प्रामुख्याने तरुणांची उपस्थिती नगण्य असते, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
या पार्श्वभूमीवर तरुणांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे राजेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. या अभियानांतर्गत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमधील गावागावांत जाऊन १० ते १२ सुजाण तरुणांचा गट तयार केला जाणार आहे. या तरुणांना ग्रामसभेचे नेमके महत्त्व काय आहे, ग्रामसभेची कार्यपद्धती (प्रोसिडिंग) कशी चालते, कायद्यानुसार ग्रामसभेचे अधिकार काय आहेत आणि या अधिकारांचा वापर करून गावाचा सर्वांगीण विकास कसा साधता येतो, याचे सखोल मार्गदर्शन व कायदेशीर प्रशिक्षण दिले जाणार आहे. ग्रामसभेची रचना, नियमावली आणि गावाला मिळणारा निधी कसा खर्च व्हावा, याबद्दल तरुणांना अवगत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
पुढील १०-१५ वर्षांत आपल्या गावाचे भविष्य काय असेल, याचा विचार करून तरुणांनी आत्ताच जागे होण्याची वेळ आली आहे. जेव्हा गावातील तरुण ग्रामसभेत उपस्थित राहून योग्य प्रश्न विचारतील आणि गावविकासाच्या प्रक्रियेत कायदेशीर मार्गाने सहभागी होतील, तेव्हाच प्रत्येक गावाचा चेहरामोहरा बदलेल. त्यामुळे सर्वच तरुणांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून आपल्या गावाच्या ग्रामसभेत हक्काने उपस्थित राहावे आणि गावाच्या निर्णयप्रक्रियेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन राजेंद्र पाटील यांनी केले आहे.

Comments
Post a Comment