ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

दापोलीतील बेकायदेशीर कात कारखान्यावर कारवाईसाठी महिलेचा नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

वन विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ आणि व्यापाऱ्याला पाठीशी घालण्याचा आरोप

१५ ऑगस्टला टोकाचे पाऊल उचलणार असल्याचे रक्ताने लिहिलेल्या पत्रात नमूद


रत्नागिरी, दि. ७ (प्रतिनिधी) :- रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील कथित बेकायदेशीर 'सुप्रिया कथ्था इंडस्ट्रीज'वर वन विभागाने कडक कारवाई करावी आणि यासंदर्भातील माहिती अधिकाराखाली मागितलेली कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून द्यावीत, या मुख्य मागणीसाठी कल्याण येथील रहिवासी असलेल्या स्वाती विनोद वावडेकर यांनी येत्या १५ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते २ वाजेच्या सुमारास आत्मदहन करण्याचा तीव्र इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांसह पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री, वन मंत्री आणि उच्च पोलीस अधिकाऱ्यांना रक्ताने लिहिलेले तक्रार निवेदन पाठवून प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ आणि भ्रष्ट कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.  
​स्वाती वावडेकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, दापोली तालुक्यातील टेटवली येथील सुप्रिया कथ्था कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध खैराच्या लाकडाची साठवणूक आणि वाहतूक सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२२ मध्ये केलेल्या तक्रारींनंतर वन विभागाने सुमारे ५२४ घनमीटर अवैध खैर लाकूड जप्त करून कारखाना आणि बॉयलर सील केले होते. मात्र, कारखाना सील असतानाही कंपनी मालक विशाल सूर्यकांत मालवणकर यांनी वन अधिकाऱ्यांशी संगनमत करून बेकायदेशीरपणे उद्योग पुन्हा सुरू ठेवल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.  
​विशेष म्हणजे, या बेकायदेशीर उपक्रमांचे तसेच सील केलेला कारखाना सुरू असल्याचे व्हिडिओ पुरावे आणि लाकडांच्या साठ्याची माहिती तक्रारदार महिलेने यापूर्वीच वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केली होती. त्यावेळी कोल्हापूर येथील वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी या पुराव्यांच्या आधारे सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, तब्बल दीड वर्षाचा कालावधी उलटूनही वन विभागाने यावर कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई केली नाही, असा थेट आरोप वावडेकर यांनी केला आहे.  
​तक्रारदार वावडेकर यांनी या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे, परवाने, वीज बिलाच्या प्रती आणि जीएसटी नोंदी माहितीच्या अधिकारांतर्गत (RTI) मागितल्या होत्या. परंतु, दापोली वन विभागाचे अधिकारी आणि परिक्षेत्र वन अधिकारी (RFO) प्रकाश पाटील व राजेंद्र पाटील माहिती देण्यास टाळाटाळ करत असून, उलटपक्षी तक्रारदार महिलेवरच न्यायालयात गुन्हे प्रलंबित असल्याचे कारण देऊन अर्ज फेटाळत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तक्रारदाराचा आरोप आहे की, वन विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक कर्मचारी हे संबंधित उद्योगपतीला पाठीशी घालत असून, भ्रष्टाचारापोटी नियमांची पायमल्ली केली जात आहे.  
​वारंवार उपोषणे आणि ठोस पुरावे देऊनही वन विभागाकडून केवळ पोकळ आश्वासनेच मिळाली असून, उलटपक्षी आपल्याला व आपल्या कुटुंबाला संबंधित घटकांकडून जीविताचा धोका निर्माण झाल्याचा दावा स्वाती वावडेकर यांनी केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आश्वासन हवेत विरल्याने आणि भ्रष्ट कारभाराला कंटाळून अखेर १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी नागपूर येथे आत्मदहन करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आपल्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी दापोली वन विभाग व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची असेल, असा इशारा देत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची आणि लाडक्या बहिणीला न्याय देण्याची विनंती केली आहे.

Comments

Popular posts from this blog