धोधो पाऊस पडूनही मुंगोशी बौद्धवाडीत पाण्याचा थेंब नाही!
ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ आक्रमक
बेणसे-रायगड, दि. १२ (चंद्रकांत अडसुळे) :- सध्या सर्वत्र धोधो पाऊस पडत असताना दुसरीकडे पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बेलवडे हद्दीतील मुंगोशी बौद्धवाडी (जय भीम नगर) येथील नागरिकांना मात्र गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाऊस कोसळत असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याने संतप्त झालेल्या बौद्ध ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या उदासीन कारभाराविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला असून वरिष्ठांकडे निवेदने देऊन कायदेशीर लढ्याची तयारी दर्शवली आहे.
मुंगोशी बौद्धवाडीतील पाणीपुरवठा योजनेची बोरवेल आणि त्यावरील विद्युत मोटार (इलेक्ट्रिक पंप) गेल्या पाच महिन्यांपासून नादुरुस्त अवस्थेत आहे. या तांत्रिक बिघाडामुळे परिसरातील महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य ग्रामस्थांचे अतोनात हाल होत असून त्यांच्या आरोग्यावर व दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ नुसार ग्रामस्थांना शुद्ध व पुरेसे पाणी पुरवणे ही ग्रामपंचायतीची वैधानिक जबाबदारी आहे. तसेच संविधानाच्या अनुच्छेद २१ नुसार स्वच्छ पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. तरीही प्रशासनाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.
या गंभीर समस्येबाबत बौद्धवाडीतील नागरिकांनी १७ एप्रिल २०२६ रोजी ग्रुप ग्रामपंचायत बेलवडे यांना पहिले लेखी निवेदन दिले होते. परंतु प्रशासकीय पातळीवर कोणतीही हालचाल न झाल्याने १७ जुलै २०२६ रोजी स्मरणपत्रही देण्यात आले. आता या स्मरणपत्रालाही महिना उलटून गेला तरी ग्रामपंचायतीच्या एकाही अधिकाऱ्याने अथवा कर्मचाऱ्याने बोरवेलची साधी पाहणी करण्याची तसदी घेतलेली नाही. "आम्ही माणसे नाहीत का? आम्ही दलित समाजाचे असल्यामुळेच ग्रामपंचायत प्रशासनाकडून आमच्यावर हा अन्याय केला जात आहे का?" असा संतप्त सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर जातीय आकस आणि भेदभाव करत असल्याचा थेट आरोप केला आहे.
याप्रकरणी ग्रामस्थांनी नादुरुस्त बोरवेल व विद्युत उपकरणांची तात्काळ तंत्रज्ञांमार्फत दुरुस्ती करावी, दुरुस्तीचा खर्च वित्त आयोग किंवा पाणीपुरवठा योजनेच्या निधीतून करावा आणि कायमस्वरूपी व्यवस्था होईपर्यंत टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करावा, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत. याबाबत पेणचे गटविकास अधिकारी, तहसीलदार, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने पाठवण्यात आली आहेत. तसेच या पाणीप्रश्नाबाबत लवकरच मंत्रालयात जाऊन सामाजिक न्याय मंत्री मा. संजय शिरसाट यांची भेट घेऊन त्यांना साकडे घालणार असल्याचेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने या निवेदनाची त्वरित दखल घेऊन बौद्धवाडीतील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अन्यथा आपल्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी सक्षम प्रशासकीय प्राधिकरण, लोकायुक्त अथवा थेट उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा मुंगोशी येथील बौद्ध बांधवानी दिला आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या सर्व परिणामांना बेलवडे ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनच पूर्णपणे जबाबदार राहील, असा सज्जड दमही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Comments
Post a Comment