माणगाव तालुका प्रेस क्लबतर्फे 'आदर्श शेतकरी पुरस्कार' सोहळा संपन्न
गांगवली-मोकाशीवाडी येथे भूमिपुत्रांच्या कर्तृत्वाचा विशेष बहुमान
कृषीनिष्ठेचा सन्मान
माणगाव-रायगड, दि. ७ (उत्तम तांबे) :- रायगड जिल्हा प्रेस क्लबशी संलग्न असलेल्या माणगाव तालुका प्रेस क्लब या सेवाभावी पत्रकार संघटनेच्या वतीने बुधवार, दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी माणगाव तालुक्यातील गांगवली-मोकाशीवाडी येथे 'आदर्श शेतकरी पुरस्कार' वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. गांगवली आणि मोकाशीवाडी पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकरी दांपत्य श्री. विजय विष्णू दाखीणकर व सौ. वैभवी विजय दाखीणकर, तसेच श्री. रामदास महिपत धाडवे व सौ. शैला रामदास धाडवे या शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी योगदानाचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या दोन्ही प्रगतशील शेतकरी दांपत्त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन 'आदर्श शेतकरी पुरस्कारा'ने अत्यंत सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.
शेतकऱ्यांनी दाखवलेली शेतीनिष्ठा, त्यांची नाविन्यपूर्ण उपक्रमशीलता आणि सामाजिक जाणीव यांचा हा खऱ्या अर्थाने गौरव असल्याचे याप्रसंगी उपस्थितांनी नमूद केले. आजच्या तरुण पिढीने शेती व्यवसायाकडे सकारात्मकतेने आकर्षित व्हावे आणि कृषी क्षेत्रात अधिक ताकदीने भर देऊन उत्पादन वाढवावे, या अत्यंत महत्त्वाकांक्षी उद्देशाने माणगाव तालुका प्रेस क्लब दरवर्षी अशा प्रकारच्या स्तुत्य उपक्रमांचे आयोजन करत असते.
सदर गौरवशाली कार्यक्रमाचे नेटके आयोजन माणगाव तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष सुतार, रायगड जिल्हा सहसचिव पद्माकर उभारे, कार्याध्यक्ष गौतम जाधव, उपाध्यक्ष आरती म्हामुणकर व विश्वास गायकवाड, सचिव हरेश मोरे, खजिनदार सचिन वनारसे, सल्लागार उत्तम तांबे व विनोद सापळे आणि सदस्य सुनील राजभर यांनी केले होते. या सोहळ्याला माणगावचे प्रांताधिकारी संदिपान सानप, जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलावडे, पंचायत समिती सभापती विलास शिंदे, पंचायत समिती उपसभापती मनीषा मालोरे, पंचायत समिती सदस्य अक्षय जाधव, गांगवली ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली जाधव, ज्येष्ठ समाजसेवक गजानन मोरे, कृषी अधिकारी किरण पडवळकर, वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे आणि पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीचे सहकारी कुलदीप पुरंदरे यांच्यासह अनेक सहकाऱ्यांची आणि परिसरातील शेतीप्रेमी नागरिकांची उदंड उपस्थिती लाभली होती.


Comments
Post a Comment