ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

दक्षिण कोरिया आणि थायलंडमधील आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत संतोष गुलदेकर यांची दमदार कामगिरी!

 ३ रौप्य व १ कांस्य पदकांची कमाई 

मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) :- दक्षिण कोरिया आणि थायलंड येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धांमध्ये मोहन स्पोर्ट्स अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक तथा तायक्वांदो ग्रँडमास्टर श्री. संतोष गुलदेकर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत त्यांनी तब्बल ३ रौप्य आणि १ कांस्य पदकांची कमाई केली असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दि. १८ आणि १९ जुलै २०२६ रोजी दक्षिण कोरिया येथे वर्ल्ड तायक्वांदो कल्चरल एक्स्पो २०२६ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जगभरातील सुमारे ३० ते ३५ देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तसेच ३,५०० पेक्षा अधिक खेळाडूंनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावले. या स्पर्धेत संतोष गुलदेकर यांनी पुमसे आणि क्युरोगी अर्थात फाइट या दोन्ही प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदकांची कमाई केली.

दक्षिण कोरियातील स्पर्धेतील यशानंतर संतोष गुलदेकर यांनी थायलंडमध्येही आपल्या कामगिरीची चमक दाखवली. दि. ३१ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पटाया, थायलंड येथे ९वी हिरोज इंटरनॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत २६ देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता, तर ३,४६४ पेक्षा अधिक खेळाडूंनी विविध प्रकारांमध्ये सहभाग नोंदवला. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही संतोष गुलदेकर यांनी पुमसे प्रकारात कांस्य, तर क्युरोगी अर्थात फाइट प्रकारात रौप्य पदक पटकावून आपल्या कौशल्याची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडली.

तायक्वांदो क्षेत्रात प्रदीर्घ काळापासून कार्यरत असलेले संतोष गुलदेकर हे मोहन स्पोर्ट्स अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक असून ते तायक्वांदोमध्ये ग्रँडमास्टर म्हणून कार्यरत आहेत. ते ब्लॅक बेल्ट ५ डॅन धारक असून, खेळाडूंना प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यातील कौशल्याला योग्य दिशा देण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. स्वतः आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू म्हणून सहभागी होत त्यांनी वय हा केवळ आकडा असल्याचे आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.

संतोष गुलदेकर यांच्या या उल्लेखनीय यशामागे त्यांचे गुरू स्वर्गीय श्री. मोहन सर यांचे मार्गदर्शन आणि संस्कार यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले जाते. तसेच अदिती, आर्या आणि श्रेया यांचेही या यशामध्ये महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. समिक्षा आणि वेदांत कायंदेकर यांचे तायक्वांदो क्षेत्रातील गुरू, मार्गदर्शक आणि प्रशिक्षक म्हणूनही संतोष गुलदेकर कार्यरत आहेत.

दक्षिण कोरिया आणि थायलंड या दोन्ही देशांमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत ३ रौप्य आणि १ कांस्य पदक मिळवून संतोष गुलदेकर यांनी देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. वयाच्या ५३व्या वर्षीही त्यांचा उत्साह, जिद्द आणि खेळाप्रती असलेली निष्ठा युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, तायक्वांदो प्रशिक्षक, खेळाडू, विद्यार्थी, पालक तसेच विविध स्तरातील नागरिकांकडून संतोष गुलदेकर यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Comments

Popular posts from this blog