ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक स्वयंचलित रोगनिदान यंत्रणा कार्यान्वित

संसर्गजन्य आजारांवर आता जलद व अचूक उपचार

बेणसे-रायगड, दि. १४ (चंद्रकांत अडसुळे) :- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) विभागात रुग्णांच्या सेवेसाठी अत्याधुनिक 'स्वयंचलित कल्चर सिस्टीम' (Automated Culture System) आणि 'स्वयंचलित कल्चर आयडेंटिफिकेशन आणि अँटीमायक्रोबियल ससेप्टिबिलिटी टेस्टिंग' (Automated Culture Identification and Antimicrobial Susceptibility Testing) ही उपकरणे नुकतीच कार्यान्वित करण्यात आली आहेत. या अद्ययावत सुविधेमुळे संसर्गजन्य आजारांचे निदान आता अधिक वेगाने आणि अत्यंत अचूकतेने होणार असून, रायगड जिल्ह्यातील गरजू रुग्णांना त्वरित आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. प्रसन्न नकाते, डॉ. रश्मी बावणे, डॉ. प्रिती नरवाडे, डॉ. गितांजली पेवेकर आणि विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांतून ही प्रगत आरोग्य यंत्रणा रुग्णांच्या सेवेत दाखल झाली आहे. कोणत्याही संसर्गजन्य (Infection) आजाराने ग्रस्त रुग्णावर वेळेत आणि प्रभावी उपचार करण्यासाठी त्याला नेमक्या कोणत्या जंतूंचा संसर्ग झाला आहे, तसेच त्यावर नेमकी कोणती औषधे (Antibiotics) लागू पडतील, हे अचूकपणे ओळखणे अत्यंत आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर कार्यान्वित करण्यात आलेली ही स्वयंचलित प्रणाली रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरणार आहे.

​पारंपरिक मॅन्युअल (Manual Culture) पद्धतीमध्ये जिवाणूंची वाढ होण्यासाठी, त्यांची ओळख पटवण्यासाठी आणि योग्य औषधांचा प्रभाव तपासण्यासाठी किमान ३ ते ४ दिवस किंवा त्याहून अधिक कालावधी लागत असे. मात्र, या नव्या स्वयंचलित यंत्रणेमुळे तपासणीचे काम अत्यंत गतिमान होऊन अचूक अहवाल अल्प वेळेत उपलब्ध होणार आहे. मॅन्युअल पद्धतीत मानवी चुका होण्याची शक्यता असते, परंतु या कॉम्प्युटराइज्ड प्रणालीमध्ये मानवी हस्तक्षेपाची गरज कमी असल्याने जिवाणूंची अचूक ओळख पटवून प्रतिजैविकांची संवेदनशीलता (Antibiotics Sensitivity) निश्चित करता येते.

​अहवाल तातडीने मिळाल्यामुळे डॉक्टरांना रुग्णावर नेमके लागू पडणारे 'टार्गेटेड' उपचार सुरू करणे सहज शक्य होणार आहे. विशेषतः सेप्सिस (Sepsis) सारख्या रक्तामध्ये संसर्ग पसरणाऱ्या गंभीर रुग्णांच्या बाबतीत ही वेळेची बचत त्यांचे प्राण वाचवण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरेल. याशिवाय, अचूक निदानामुळे रुग्णाला अनावश्यक किंवा तीव्र स्वरूपाची प्रतिजैविके (Broad-spectrum antibiotics) देणे टाळता येणार असून, भविष्यातील 'अँटीबायोटिक रेझिस्टन्स'चा धोका रोखण्यास मोठी मदत होणार आहे. जलद आणि योग्य उपचार मिळाल्याने रुग्णालयातील रुग्णाचा मुक्काम कमी होईल, परिणामी रुग्णाचा आणि त्याच्या कुटुंबीयांचा मानसिक व आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात हलका होणार आहे.

​शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग येथे सुरू झालेल्या या अत्याधुनिक सुविधेमुळे आता रायगड जिल्हा आणि परिसरातील सामान्य जनतेला मोठ्या शहरांतील महागड्या खाजगी रुग्णालयांच्या दर्जाची अति-प्रगत, वेगवान व विश्वासार्ह निदान सेवा शासकीय स्तरावर सहज उपलब्ध झाली आहे.

Comments

Popular posts from this blog