ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

कर्जतच्या किरवली भागात धाडसी घरफोडी
बंद घराचे लॉक तोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने आणि सीसीटीव्ही DVR लंपास!

कर्जत-रायगड, दि. २६ जून (प्रतिनिधी) :- तालुक्यातील किरवली येथील ज्ञानदीप सोसायटीत एका बंद बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लांबवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मौजे किरवली येथील प्लॉट नंबर ०१ वर असलेल्या 'श्रद्धा' बंगल्यामध्ये हा धाडसी चोरीचा प्रकार घडला. दिनांक २४ जून २०२६ रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हा डल्ला मारला असून, यामुळे परिसरात कमालीची घबराट पसरली आहे.

​या घटनेबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, महिला फिर्यादी यांचे कुटुंब घरात नसताना किंवा रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या 'श्रद्धा' बंगल्याला लक्ष केले. चोरट्यांनी अत्यंत शिताफीने घराच्या सेफ्टी डोअरचे आणि मुख्य दरवाजाचे लॉक तोडले, तसेच खिडकीचे लोखंडी ग्रील कटर किंवा इतर हत्याराच्या साहाय्याने कापून आत प्रवेश केला. बंगल्यात शिरल्यानंतर चोरट्यांनी थेट बेडरूम गाठली आणि तेथील कपाटाचे कुलूप तोडून आत ठेवलेली ८५,००० रुपयांची रोकड आणि मौल्यवान सोन्याचे दागिने असा ऐवज हस्तगत केला. एवढेच नव्हे तर चोरट्यांनी घरातील देव्हाऱ्याचीही विस्कटून टाकली आणि तेथे पूजेसाठी ठेवलेली चांदीची मौल्यवान भांडी देखील चोरून नेली. आपली ओळख पटू नये आणि पोलिसांना कोणताही पुरावा मिळू नये यासाठी चोरट्यांनी जाता जाता घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे 'डीव्हीआर' (DVR) मशीन देखील सोबत पळवून नेले.

​या संपूर्ण प्रकरणी महिला फिर्यादी यांनी कर्जत पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून कर्जत पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात कर्जत पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर २८०/२०२६ नुसार, नवीन भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५(A) आणि ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या धाडसी घरफोडीच्या घटनेमुळे किरवली परिसरातील रहिवाशांमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास आणि चोरट्यांचा शोध कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वरक हे करीत आहेत.


Comments

Popular posts from this blog