ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

​रेवदंडा येथे रिक्षा चालकांसाठी भव्य नाव नोंदणी कार्यक्रम संपन्न
परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे लाभार्थ्यांना मार्गदर्शन

अलिबाग, दि. २३ (स्वप्निल नाईक) :- रायगड जिल्ह्यातील रेवदंडा (पारनाका), ता. अलिबाग येथे सर्व रिक्षा चालक बांधवांच्या उपस्थितीत 'धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळा'च्या वतीने भव्य नाव नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर रिक्षा चालकांनी या कल्याणकारी मंडळात सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शक म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) श्री. माधव सूर्यवंशी तसेच सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर वाहन निरीक्षक श्री. रोहित कारवार आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक श्री. संदेश मोरे उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांनी रेवदंडा येथील रिक्षा चालकांच्या सभेत सहभागी होऊन या मंडळामध्ये नाव नोंदणी केल्याने मिळणारे विविध लाभ, शासनाच्या कल्याणकारी योजना, भविष्यातील सुरक्षितता आणि रिक्षा चालकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचसोबत त्यांनी रिक्षा चालकांच्या विविध समस्या व अडचणी प्रत्यक्ष समजून घेतल्या. भविष्यात परिवहन विभागाच्या माध्यमातून रिक्षा चालकांना अधिक चांगल्या सुविधा व सहकार्य मिळावे, यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासनही या वेळी अधिकाऱ्यांनी दिले.

​या कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री. अनिल मुकादम यांनी केले, तर खजिनदार श्री. महाजने यांनी नियोजनात मोलाचे योगदान दिले. संघटनेचे सर्व उपाध्यक्ष, पदाधिकारी, सभासद आणि रिक्षा चालक बांधवांच्या मोठ्या संख्येतील उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि व्यापक नाव नोंदणी मोहीम राबविण्याचे श्रेय रेवदंडा पारनाका रिक्षा युनियनला जाते. युनियनने विशेष पुढाकार घेऊन सर्व चालकांना एकत्र करत हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरित्या पार पाडला. परिवहन विभागाच्या या कल्याणकारी उपक्रमाला मोलाचे सहकार्य दिल्याबद्दल सर्व रिक्षा चालकांचे विशेष आभार मानण्यात आले. रायगड जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेली ही नोंदणी रिक्षा चालकांच्या एकजुटीचे आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरली असून, रेवदंडा परिसरात या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog