रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद व अतिजलद गाड्यांना थांबा
महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी इंदोर एक्स्प्रेसला दाखवला हिरवा झेंडा

रोहा (प्रतिनिधी) :- रोहा रेल्वे स्थानकावर जलद व अतिजलद दहा गाड्यांना  थांबा देण्याचा शुभारंभ महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 
रोहा येथे कोचुवेली इंदोर एक्स्प्रेस, कोयंबटुर हिसार एक्स्प्रेस, कोचुवेली चंढीगड एक्स्प्रेस, दादर तिरुनेलवेली एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगांव एक्स्प्रेस या दहा जलद व अतिजलद गाड्या थांबणार आहेत. यावेळी जलद गाडीतून प्रवास करणार्‍या पहिल्या प्रवाशाला खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते तिकीट देऊन शुभारंभ करण्यात आला.यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे, मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता वाय. पी. सिंग, एडीआरएन श्री शशीभूषण, एसीएम राजीव रंजन, आदीं उपस्थित होते. 
रोहा येथे जलद व अतिजलद गाड्यांना थांबा मिळावा ही गेल्या कित्येक वर्षांपासून रोहावासियांची मागणी होती. रोहा स्थानकावर अतिजलद दहा गाड्यांना थांबे रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाले आहेत आणि आज त्यांची सुरूवात होत आहेत हा आपल्या आयुष्यातील महत्वपूर्ण दिवस आहे. लवकरच २० कोटी रुपये खर्च करून रोहा रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण होणार आहे. याठिकाणी विविध सुविधा उपलब्ध होत आहेत असे महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले. 
जनतेची कामे करताना  संवेदनशील रहावे लागते. कामाची तत्परता असावी लागते आणि याच भावनेने रोहेकरांचे कित्येक वर्षाचे स्वप्न पूर्ण करत असल्याचा आनंद आहे असे खा.  तटकरे यांनी सांगितले. दूरपल्ल्याच्या गाड्या रोहा येथे थांबाव्यात यासाठी प्रयत्न होता. ते आज पूर्ण होत आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री यांचे  विशेष आभार त्यांनी यावेळी मानले. रोहा रेल्वे स्थानकावर अतिजलद गाड्यांना थांबा मिळाल्यानंतर माणगाव, रोहा, कोलाड, पेण येथील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणार्‍या गाड्या इथे थांबणार आहेत. अजून नवीन थांबे कसे मिळतील यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले जातील असे आश्वासनही खा. तटकरे यांनी दिले. 
रोहा हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण आहे. रोह्याचे सुपुत्र स्वाध्यायाचे प्रणेते प. पु. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे अनुयायी, थोर अर्थतज्ज्ञ डॉ. चिंतामणराव देशमुख आणि महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान श्री धावीर महाराज यांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. या शिवाय रोहा मध्यवर्ती औद्योगिक केंद्र म्हणून विकषित होत असल्याने येथे देशभरातून कामगार येतात. रोह्यात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळाल्याने येणाऱ्या भाविकांना व प्रवाशांना रोह्यात येण्यासाठी रेल्वेची विशेष सुविधा उपलब्ध होणार आहे. रोह्यातील प्रवासी संघटना, उद्योजक संघटना, नगरपालिका, ज्येष्ठ नागरिक संघटना व रोहा सिटिझन फोरम यांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांना रोह्यात व्यावसायिक थांबा मिळाल्याने खासदार सुनील तटकरे यांचे आभार मानले.
लांब पल्ल्याच्या गाड्यांना रोह्यात व्यावसायिक थांबा मिळाल्याने स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. यामुळे रोहा परिसरातील नागरिकांना प्रवासासाठी जास्त पर्याय उपलब्ध होऊन वेळेची बचत होणार आहे. या सोयीमुळे परिसरातील व्यापार, शिक्षण आणि सामाजिक संपर्क वाढीस लागेल. हा निर्णय रोहा परिसराच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

Comments

Popular posts from this blog