रोहा तालुक्यातील सर्वत्र साखर चौथ गणेशोत्सवाचा उत्साह
तालुकाप्रमुख समीर शेडगे यांचा बाप्पाच्या दर्शनासाठी तालुक्यात धावता दौरा
रोहा (विशेष प्रतिनिधी) :- रोहे-अष्टमी शहारासह संपूर्ण तालुक्यात साखरचौथ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. या निमित्ताने रोहा तालुक्यात साखरचौथ गणेशोत्सवाची धुम पहायला मिळाली.
या दीड दिवसांच्या उत्सव सोहळ्यात शनिवारी गणरायांचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात, वाजतगाजत विविध वाद्यांच्या गजरात आगमन झाले. महापूजा, अभिषेक, महाआरती करून गणरायांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. बहुतांश ठिकाणी सार्वजनिक उत्सव सोहळ्यात महिला व पुरूषांचे पारंपरिक नृत्य कार्यक्रम, हळदीकुंकू समारंभ, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, हरिपाठ व जागर भजन आदी कार्यक्रम संपन्न झाले. एकंदरीत हा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी गणरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण तालुक्यात धावता दौरा केला आणि सर्व भक्तगणांना सुखी ठेव असं साकडं गणरायाला घातलं. समीर शेडगे यांनी लांढर, धाटाव, उडदवणे, वरसे, भुवनेश्वर, दमखाडी, धावीर प्लाझा-कृपा, अंधार आळी, धनगर आळी, मोरे आळी, अष्टमी कासारआळी, अष्टमी मराठा आळी इत्यादी ठिकाणी दर्शन घेतले.