जिव्हाळा चॅरिटेबल ट्रस्ट मालसई तर्फे रोहा येथे पोलीस बांधवांना फेस प्रोटेक्शन शील्डचे वाटप
रोहा (रविना मालुसरे) :
जिव्हाळा चॅरिटेबल ट्रस्ट मालसई तालुका रोहा या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संस्थेमार्फत पोलीस बांधवांना फेस प्रोटेक्शन शील्ड्स सुपूर्द करण्यात आले. कोरोना आजाराचा सामना सर्वांनाच करावा लागत आहे. आपण सगळे घरी थांबलो आहोत. मात्र आपले पोलीस बांधव आहोरात्र रस्त्यावर उभे आहेत. कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधताना पोलीस यंत्रणेला अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. महाराष्ट्रात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. आपली सर्वांची काळजी घेणारे पोलीस तंदुरुस्त राहणे अत्यंत गरजेचे आहे. याच विचारांचा धागा पकडून मालसई येथील जिव्हाळा चॅरिटेबल ट्रस्ट या सेवाभावी संस्थेने फेस प्रोटेक्शन शील्ड्स तयार करून पोलीसांना वितरित केले आहे. मालसईच्या युवतींनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उचललेले हे पाऊल म्हणजे पोलीसांप्रती समाजामध्ये नव्याने तयार होत असलेल्या आस्थेचे प्रतिक मानले पाहिजे. सर्व प्रकारची प्रतिबंधक उपाय योजना करून व सोशल डिस्टन्सींगचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र शेगडे व पोलीस स्टाफ उपस्थित होता. तर जिव्हाळा चॅरिटेबल ट्रस्ट मॅनेजिंग ट्रस्टी पत्रकार कु. रविना मालुसरे, प्राजक्ता मालुसरे, प्रतिक्षा मालुसरे व शुभांगी मांडलुस्कर यांनी अथक परिश्रम घेतले. मालसई गावच्या युवतींकडून सुरू असलेल्या विविध उपक्रमांबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
