ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

दोशी वकील महाविद्यालयात 'करिअर कट्टा' मार्गदर्शन व इंडक्शन कार्यशाळा

 विद्यार्ध्यांसाठी 'दिशा-दर्शन' सत्र 

रायगड, दि. ८ (भिवा पवार) :- ​माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित दोशी वकील आर्ट्स कॉलेज अँड जी. सी. यु. बी. सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, गोरेगाव येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'करिअर कट्टा' इंडक्शन व जागृती कार्यशाळा नुकतीच शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांना उज्वल भविष्यासाठी योग्य दिशा मिळावी, या मुख्य उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

​या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. होटकर सर यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात करिअर कट्ट्यासारख्या उपक्रमांचे असणारे महत्त्व पटवून दिले. करिअर कट्टा समन्वयक प्रा. डॉ. सुभाष कदम आणि डॉ. गणेश सानप यांनी 'करिअर कट्टा' विद्यार्थ्याला स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार कसा बनवू शकतो, याविषयी उपस्थितांना सविस्तर व इत्यंभूत माहिती दिली. या कार्यशाळेत करिअर कट्टा विभागामार्फत विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या विविध सुविधा आणि राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची सखोल माहिती देणारे माहितीपट (व्हिडिओज) दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी करिअर कट्ट्याच्या ॲपमध्ये अनेक मोफत प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सर्टिफिकेट कोर्सेस) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच दररोज संध्याकाळी सात वाजता अनुभवी आयएएस अधिकारी, आयपीएस अधिकारी किंवा यशस्वी उद्योजकांचे ऑनलाईन मार्गदर्शनपर सत्र आयोजित केले जाते, या सर्व उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. वर्षभरात ३६५ दिवस चालणाऱ्या या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपला व्यक्तिमत्त्व विकास साधून स्वतःचे भविष्य घडवावे, यावर वक्त्यांनी भर दिला.

​कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. श्रीकांत चांदोरकर आणि प्राध्यापक डॉ. प्रवीणकुमार नागोरे यांनीही विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी करिअर कट्टा संसदेतील सर्व विद्यार्थी मंत्र्यांनी विशेष परिश्रम घेतले आणि त्यांच्या या प्रयत्नांमुळेच कार्यशाळा अत्यंत यशस्वी ठरली.

Comments

Popular posts from this blog