रोह्यात जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदानाचा महायज्ञ.
३०० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
रोहा, दि. १५ (संदीप सरफळे) :- "एक रक्तदान... अनेक जीवांना जीवनदान!" या संदेशाला साद देत जागतिक रक्तदान दिनानिमित्त रोहा शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत तब्बल ३०० रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला.
रोहा-अष्टमी नगर परिषद, स्व. दत्ताजीराव ग. तटकरे रक्तपेढी, वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट, डॉ. भट नर्सिंग होम व गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. युवक, महिला तसेच विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून रक्तदानाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत समाजापुढे आदर्श निर्माण केला.
शिबिरस्थळी रक्तदात्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली संपूर्ण रक्तसंकलन प्रक्रिया पार पडली. आयोजकांनी रक्तदात्यांचे प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवही केला.
"रक्तदान हेच श्रेष्ठ दान" हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सामाजिक एकोप्याचे दर्शन घडले असून, भविष्यातही अशा उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा वनश्री शेडगे, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, सर्व नगरसेवक नगरसेविका, शहरातील सर्व डॉक्टर्स उपस्थित होते.



Comments
Post a Comment