माणगांव रोटरी क्लब तर्फे मास्क वाटप, कोरोना व्हायरस पासून बचावासाठी प्रतिबंधनात्मक तयारी
माणगांव (प्रतिनिधी) :
सध्या जगात सुरु असलेली 'भयाण महामारी' ज्याला संबोधले जात आहे ती म्हणजे कोरोना व्हायरस ची लागण.! आज इटली, युरोप आणि पाश्चात्य राष्ट्रांची अवस्था झाली ती खूपच भयानक आहे. त्यामानाने आज पहाता आपले भारत देशवासीय या भयानक व्हायरसच्या संक्रमणावर आळा घालण्यासाठी कटीबद्ध असल्यामुळे तेवढासा शिरकावा कोरोनाला भारतात करता आला नाही, मात्र वाढत्या संक्रमणाची भिती नाकारता येऊ शकत नाही. आज आपला देश संक्रमणाच्या दुसऱ्या पायरीवरुन तिसऱ्या पायरीवर जात आहे.
यासाठी माणगांव तालुका आणि माणगांव शहराने प्रतिबंधनात्मक तयारीचा जोर धरला आहे आणि त्यामध्ये रोटरी क्लब ऑफ माणगांवचा सिंहाचा वाटा आहे. सुमारे ५००० मास्क वाटपाचा निर्धार आणि मनाशी खुणगाठ बांधून रोटरी क्लब ऑफ माणगांवने पावले उचलली आहेत. त्यामध्ये माणगांव तालुक्यातील विवीध सार्वजनिक कामकाजाची कार्यालये त्यामध्ये प्रांताधिकारी कार्यालय माणगांव, डी वाय एस पी कार्यालय माणगांव, पोलीस ठाणे माणगांव, तहसिलदार कार्यालय माणगांव, दुय्यम निबंधक कार्यालय माणगांव, नगरपंचायत कार्यालय माणगांव, वाहतुक पोलीस शाखा माणगांव, एस टी आगार माणगांव व माणगांव तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना यांना रोटरी क्लब ऑफ माणगांवने मास्क वाटप केले.
या कार्यक्रमामध्ये रोटरी क्लबचे प्रेसिडेंट रोटे. अॅड मोहन मेथा, सेक्रेटरी रोटे. बिपीन दोशी, खजिनदार रोटे. निलेश मेथा, मेंबरशिप डेव्हलपमेंट रोटे. हेमंत शेठ, रोटे. अॅड. योगेश तेंडुलकर व सर्व रोटरी मेंबर्सनी सहभाग नोंदविला. रोटरी क्लब ऑफ माणगांव ही संस्था माणगांव शहरात सामाजिक भान ठेऊन वेगवेगळे उपक्रम राबवत असते. मात्र कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या प्रतिबंधासाठी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे अर्थात, रोटरी क्लब ऑफ माणगांवचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.