होळी समोर गाऱ्हाणे, अफवांच्या अपप्रवृत्तींचा नायनाट होऊं दे रे महाराजा.!
माणगांव (प्रतिनिधी) :
होळीच्या सणात कोरोना पेक्षा अफवांच्या व्हायरसची अधिक भिती पसरली आहे. लोक म्हणतात अफवांचा व्हायरस अधिक घातक आहे. कमी जास्त होणारे तापमान, ॠतुला अनुसरुन नसणारे वातावरणातील अनियमीत बदल यांमुळे सोशल माध्यमातून पसरणाऱ्या अफवांची भिती वाढली आहे. नेमके यासाठीच होळीच्या सणात होळीसमोर गाऱ्हाणे घालुयात "अफवा पसरविणाऱ्या अपप्रवृत्तीचा नायनाट होऊं दे रे महाराजा" देशातील महागाई, संविधानावरुन उठलेले नागरिकता बिल संघर्षाचे पडसादामुळेही देशात अस्थिरता असल्यासारखी स्थिती निर्माण केली गेली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे भारत दौऱ्या दरम्यान झालेले दिल्लीतील दंगे, अर्थव्यवस्थेची नाजुक स्थिती, जागतिक मंदी, रोगाच्या भितीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवरील परिणाम अनेक कारणांमुळे त्याचे सरळसरळ परिणाम भारतिय सणावारांवर उमटत आहेत.
होळीत रंगाची उधळण करणे, चिनी रंग वापरणे घातक ठरणार असून आता लोक घाबरले आहेत. त्यातच सोशल मिडियामुळे जगातील, देशातील, आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या सर्वच बातम्या, माहिती तात्काळ उपलब्ध होत आहे. लगेचच त्यावर प्रतिक्रीया अफवा पसरल्या जात आहेत. या सर्व गोष्टींचे आता माणसाचे जीवनावर चांगले-वाईट परिणाम वेगाने दिसून येत आहेत. काही वर्षांपूर्वी गणपती दूध पितो हा विषय एवढा वाऱ्यासारखा पसरला होता की जगात सगळीकडेच हा अनुभव लोक घेण्यासाठी गणपतीच्या मुर्तीला चमच्याने दूध पाजू लागले होते. याला ज्ञान म्हणावे कि अज्ञान, अशी स्थिती विज्ञानयुगात त्यावेळी निर्माण झाली होती. वैज्ञानिक दृष्ट्या ही गोष्ट का घडते? हे नंतर सिध्द झाले होते. विज्ञानातील वासू कपाच्या नियमाने हे घडते, मुर्ती दूध पिते असे भासते. आता तर मोबाईल इंटरनेट थ्रीजी, फोरजी असे मजल दरमजल सेव्हनजीच्या पुढे गेलेल्या वेगवान ज्ञानामुळे जग फारच पुढे चालले आहे.
परिणामी मानवी जीवन प्रगतीकडे सरकत असतानाच अधोगती, विनाशा कडे चालले नाही नां? असा प्रश्नही निर्माण होत आहे. तशी मानसिकता समाजात दिसून येत आहे. अफवांमुळे माणसाने काय खाऊ नये, काय खावे या भितीने मांसाहार सोडाच काही प्रकारचा भाजीपालाही खाणे सोडले, अनारोग्य, अज्ञान, अंध्दश्रध्दा, धार्मिकवाद-दंगे, सामाजीक शांतता बिघडणे, एखाद्या गोष्टीचे विपरीत पडसाद उमटल्याने समाजजीवन पूर्ते ग्रासून जात आहे. यासाठीच विपरीत गोष्टींना आळा घालुयात. होळी मध्ये या अफवा पसरविणाऱ्या बुरसट विचारांची होळी करुया. अन्यथा इंटरनेटवर फाॅरवर्डेड मेसेजची सत्यता नपडताळता संदेशांच्या देवाणघेवाणी मुळेच अफवांनी माणसे मरतील ! असे भितीदायक चित्र जगात दिसून येत आहे.
सणांचा आनंद लोकांनी घ्यावा, लोकांचा सहभाग, लोकांचा उत्साह, लोकांतील एकोपा वृध्दींगत व्हावा यासाठीच होळीसमोर प्रार्थना करूयात, वाईट विचारांचे, प्रवृत्तींचे दहन करुयात आणि निर्धास्तपणे सण साजरा करुयात ! अशी भावना समाजमनातून व्यक्त होत आहे. भारतीय हिंदू संस्कृती श्रेष्ठ आहे विज्ञानाचा वेग, संत-महंत, देवादिकांचे काळात आताच्या पेक्षाही जास्त होता. ज्ञानदेवांनी भिंत चालविली होती, रेड्याच्या तोंडून वेद वदवीले होते. त्याआधी देवादिकांचे काळात क्षणार्धात अंतर्धान पावण्याचे, प्रकट होण्याचे, त्रिलोकात फिरण्याचे ज्ञान अवगत होते. तिच ही अध्यात्मीक संस्कृती आणि त्याचे महात्म्य जपणारे सण, उत्सव जतन करण्याची गरज आहे. कारण ज्ञान विज्ञान आणि शेवटी तत्वज्ञान अध्यात्माकडेच जावे लागते.