रोहा उपजिल्हा रूग्णालयाबाबत पालकमंत्री सकारात्मक
रोहेकरांच्या मागणीबाबत लवकरच निर्णय
रोहे (समीर बामुगडे) :-
रोहा उपजिल्हा रूग्णालयाबाबक रोहेकरांच्या भावनांना समजत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मार्चच्या पहिल्या आठवड्यात याबाबत मंत्रालय स्तरावरील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे मान्य केले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांना रोहा उपजिल्हा रूग्णालयाच्या समस्यांची माहिती देऊन बैठकीपूर्वी जे विषय निकालात निघू शकतात त्यांची तातडीने पूर्तता करण्याचे आदेश पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
रोहेकरांनी विशेषतः युवकांनी पुन्हा एकदा उठाव करत रोहा उपजिल्हा रूग्णालयाचा प्रश्न हातात घेतला असून याबाबतची बैठक रविवारी शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत रोहा ग्रामीण रूग्णालयाच्या सेवांबाबतच्या सद्यस्थितीवर चर्चा झाली. रोह्यातील वैद्यकीय सेवा प्रभावित होण्यामागची कारणे पाहताना रोहा उपजिल्हा रूग्णालयातील बहुतांशी पदे रिक्त असल्याने खाजगी रूग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याच्या त्रुटी दिसून आल्या. तसेच हा ताण क्षमतेबाहेरचा असल्याने रोह्यातील वैद्यकीय व्यावसायिकही सेवा देताना पुरेसा न्याय देत नसल्याची खंत रोहेकरांनी मांडली.
यावर बैठकीत चर्चा होऊन स्वप्नील धनावडे, रोशन चाफेकर, निखिल दाते, सुरज शिंदे, अरूण साळुंखे, चेतन कोरपे, समीर दळवी, भुपेंद्र धाटावकर, विक्रम जैन, आशिष शहा, भालचंद्र पवार यांचा एक गट याबाबत पूर्ण माहिती घेऊन त्या आधारावर खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपजिल्हा रूग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकिता खैरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाहीची मागणी करण्याचे ठरले होते. त्यानुसार पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांना स्वप्नील धनावडे, रोशन चाफेकर, पराग फुकणे, निखिल दाते, सुरज शिंदे, अरूण साळुंखे, चेतन कोरपे, समीर दळवी, विक्रम जैन, आशिष शहा, भुपेंद्र धाटावकर, प्रथमेश खानोलकर यांनी निवेदन दिले.
त्यावर पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तात्काळ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांच्याशी संपर्क साधून रोहा उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त पदांची माहिती घेऊन ती भरण्याबाबत काय करता येईल याबाबतचा प्रस्ताव करण्यास सांगितले. तसेच रोहा उपजिल्हा रूग्णालयात श्वान दंश, विंचू दंश व सर्पदंश यांवरील औषधे योग्य त्या प्रमाणात तातडीने अलिबाग जिल्हा रूग्णालयातून पाठवण्याचे आदेश दिले. १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेवर डॉक्टर उपलब्ध नसतात या समस्येवर संबंधित एजन्सीच्या माध्यमातून कंत्राटी डॉक्टर उपलब्ध करून देण्यास सांगितले. तसेच रोहा उपजिल्हा रूग्णालयात डायलिसीस सह अन्य उपकरणे उपलब्ध करण्याबाबतच्या मागील निर्णयाची सद्यस्थिती कळवण्यास सांगितले. रोहा तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या आरोग्य दक्षता समितींचे पुनर्गठन लवकरात लवकर करण्याचे आदिती तटकरे यांनी मान्य केले.
रोह्यात डॉक्टर येण्यास टाळाटाळ करतात, यावर त्यांना आवश्यक ते सहकार्य देण्याचे युवक प्रतिनिधींनी मान्य केले. तसेच या प्रतिनिधींचा समावेश असलेली सुकाणू समिती रूग्णालयाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याचे काम करेल असेही सांगितले. तसेच रोह्यातील स्वयंसेवी संस्था श्वान दंश, विंचू दंश व सर्पदंश यांवरील औषधे उपलब्ध करून देण्यासाठीही सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
त्याचबरोबर रोह्यातील सर्व डॉक्टरांशी चर्चा करून रविवारीही आरोग्य सेवा देण्याची व्यवस्था, रात्री-अपरात्री सेवा मिळणेबाबत होणारी अडचण याविषयी चर्चा करणार असल्याचे स्वप्नील धनावडे यांनी सांगितले.